लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकरी संतप्त
चाणजे शेतकरी संघर्ष समिती विविध मागण्याबाबत आक्रमक
उरण (विठ्ठल ममताबादे ): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने हे जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवचे अस्तित्व अबाधित ठेवावेत अन्यथा चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. या महत्वाच्या समस्यावर दिनांक 26/4/2022 रोजी तहसील कार्यालय उरण येथे महत्वाची मिटिंग संपन्न झाली. या मिटिंग मध्ये करंजा टर्मिनल कंपनीचे अधिकारी , तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सिडको प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. या बैठकीत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी केला होता .सदर ठिकाणी संबंधित साकव/खारबंड रस्ता याचा थेट संबंध येथील शेतकऱ्यांच्या जमिनीशी असून देखील करंजा टर्मिनल कंपनीचा काहीही संबंध नसताना येथील बाधित शेतकऱ्यांना न विचारता,न जुमानता बेकायदेशीर जड वाहतूक सुरु आहे.सदर ठिकाणी जड वाहतूक संबंधि शेतकरी यांची कोणतेही परवानगी न घेता त्या जागेवर विविध कामे सुरु आहेत.जड वाहनांची ये जा सुरु आहे.अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्याने,या महत्वाच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे अविनाश म्हात्रे यांनी बैठकीत सांगितले होते .कोणत्याही मागण्या पूर्ण होत नसल्याने बाधित शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 मे 2022 पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलीस प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. यावेळी सिडको प्रशासन, पोलीस प्रशासन, चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी सदस्य यांच्यात गुरवार दिनांक 19/5/2022 रोजी विविध समस्यावर बैठक झाली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, सिडकोचे द्रोणागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता मुंडे, करंजा टर्मिनलचे अधिकारी रंगनाथ गरुड, चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.यावेळी सिडको प्रशासनाने लेखी आश्वासन देण्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष आश्वासन दिले होते.सदर ठिकाणी संबंधित साकव /खारबंड रस्त्यावर 250 एकर शेतजमिनीचे अस्तित्व अवलंबून आहे. त्या अनुषंगाने साकव खारबंड रस्ता सुरक्षा संदर्भात लेखी आश्वासन देण्याचे कबूल केले होते.यावेळी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.मात्र अजूनही लेखी पत्र बाधित शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकरी आता संतप्त झाले आहेत. सिडको प्रशासनाने लेखी लिहून देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र अद्यापही लेखी लिहून न दिल्याने सिडको व इतर प्रशासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवत येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी केला आहे.