स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाने आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात हर घर झंडा हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले
आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी\ (ग्रा.प.) श्री. देसाई, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा, खाजगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये, सहकारी संस्था व नागरिकांनी आपल्या घरावर तसेच इमारतीवर 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे. राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत. प्लॅस्टिकचे ध्वज वापरु नयेत. सदरचे राष्ट्रध्वज आस्थापना तसेच नागरिकांनी विकत घ्यावयाचे असून त्याकरीता विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. हर घर झंडा उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. या उपक्रमाद्वारे प्रसारमाध्यमातून देशाभिमान व जाणीव-जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांडेकर यांनी यावेळी केल्या.
बैठकीला शिक्षण, नगरपालिका प्रशासन, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.