https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

हर घर तिरंगा जनजागृतीसाठी दापोलीत निघाली सायकल फेरी

0 45

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजन

दापोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सायकल फेरी काढण्यात आली.

या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली- एसटी स्टँड- पोलीस स्टेशन – बाजारपेठ- पंचायत समिती- एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक- पांगारवाडी- जालगाव ग्रामपंचायत- भैरी मंदिर- आझाद मैदान असा ८ किमीचा होता. मुसळदार पाऊस असूनही या सायकल फेरीत सर्व वयोगटातील १२० पेक्षा अधिक सायकलस्वार सायकलवर झेंडा लावून सहभागी झाले होते. गटविकास अधिकारी रुपा दिघे, कृषी अधिकारी सुनिल खरात, जालगाव सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावळे, ग्रामविकास अधिकारी सतीश साकवे, सचिन तोडणकर आणि सहकारी कर्मचारी, ग्रामस्थ इत्यादीही यामध्ये सहभागी झाले होते. या सायकल फेरीसाठी दापोली अर्बन बँकने तिरंगा ध्वज देऊन सहकार्य केले. घोषणा आणि रोहित शिंगे यांनी म्हटलेली देशभक्तीपर गाणी यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, सुनील रिसबूड, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, पराग केळसकर, सुरज शेठ, शैलेश मोरे, प्रशांत पालवणकर, मृणाल खानविलकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.