भक्तीकुंज गृहसंकुलातील रहिवाशांकडून रॅलीतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील नवनिर्माण प्रशालेतर्फे जनजागृतीसाठी बुधवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीचे मिरजोळे एमआयडीसीमधील रहिवाशांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘भक्तीकुंज गृहसंकुला’तील रहिवाशांकडून रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात नायक, क्रांतिकारक , स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसांत रहावी, या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर जनजागृतीचा भाग म्हणून रत्नागिरी एमआयडीसीमधील नागरी वस्तीत येथील नवनिर्माण प्रशालेच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी भक्तीकुंज गृहसंकुलामधील नागरिकांनी या रॅलीचे मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत करून रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांना प्रेरित केले.
या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘हर घर तिरंगा’ जागृती रॅली दाखल होताच रॅलीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘आजादी का अमृत महोत्सवा’ निमित्त विविध घोषणा देत रहिवाशांमध्ये जनजागृती केली.
यावेळी भक्तीकुंज गृहसंकुलामधील नागरिकांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. रॅलीचे अशा प्रकारे स्वागत करण्यात आल्याने नवनिर्माण हाय तसेच कॉलेजच्या वतीने भाक्तीकुंज गृहसंकुलातील रहिवाशांचे आभार मानण्यात आले. या नंतर ही रॅली पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.