दिल्ली, दि. 22 : वर्ष 2020 साठीच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर, तर ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला असून याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगण यांना जाहीर झाला आहे.
येथील नॅशनल मीडिया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
प्लानेट मराठीतर्फे निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे. या चित्रपटाला एक लाख रुपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या दोघांनाही सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोखीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट – सोराराई पोट्टरू) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि पन्नास हजार रुपये असे आहे. तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभुषेसाठीही पुरस्कार जाहीर झाला असून वेशभूषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ आणि पन्नास हजार रूपये असा पुरस्कार जाहीर झाला आहे.