Ultimate magazine theme for WordPress.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0 26

सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ

मुंबई, दि. २५ : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास  योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

विधिमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी  ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ आज झाला. याप्रसंगी श्रीमती आनंदी गुरव, रमेश खाडे, विजय औंधे, बाबाजी चिपळूणकर, चंद्रमोहन परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत प्रवास सवलत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठीदेखील लागू असणार आहे, असे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सवलत योजनेची वैशिष्ट्ये :  वातानुकुलित, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलित, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.