स्मशानभूमिसाठी वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे शासन- प्रशासनाचे दुर्लक्ष
गुहागर : पावसाळ्यात नदीनाले दुथडी भरून वाहू लागले की, वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू ही ग्रामस्थांसाठी शारीरिक यातना देणारी ठरते. शासकीय स्मशान भूमीपर्यंतचा प्रवास नाल्यातून करावा लागतो. या नाल्यावर साकव बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थ कित्येक वर्षांपासून करीत आहेत. परंतु तांत्रिक कारणांमुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. विकासाच्या गप्पा ठोकणारे गुहागर मतदारसंघांतील एकही लोकप्रतिनिधी याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.
वरवेली तेलीवाडीचे स्मशान एका नाल्याच्या पलीकडे आहे. शासनाने लोकांच्या सोयीकरिता या ठिकाणी चौथरा, पत्र्याची शेड असा खर्चही केला आहे. पावसाळ्यात धोकादायक नाला पार करावा लागू नये तसेच पावसानंतरही नाल्यातील दगड-धोंड्यातून जाण्याचा त्रास वाचावा म्हणून कायम स्वरूपी साकव, छोटा पूल बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करत आहेत. मात्र स्मशान भूमीकडे जाणाऱ्या पायवाटेची नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरात ही नाही. ही पायवाट खासगी जागेतून आहे. तसेच, हा नाला बारमाही वाहत नाही. जून, जुलैमधील पावसाचा जोर कमी असला की नाला सहज पार करता येतो. परंतु शासन-प्रशासन ग्रामस्थ करत असलेल्या अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.