खा. विनायक राऊत यांनी कोकणचे नाव खराब केले
राजेश क्षीरसागर यांच्या गंभीर आरोपनंतर नीलेश राणे गरजले
ट्विटवर दिली खरमरीत प्रतिक्रिया
रत्नागिरी : निवडणूक असो वा कार्यक्रम, शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांना ‘बॅग‘ द्याव्या लागतात, असा गंभीर आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्यानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले असून विनायक राऊत यांनी कोकणाचं नाव खराब केलं आहे असा घणाघात करत त्या बॅग नेमक्या कोणासाठी होत्या हे सांगा असे ट्विट त्यांनी केले आहे.
कोल्हापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. त्याचे पडसाद कोल्हापूर येथे उमटले असतानाच राजेश क्षीरसागर यांनीही जोरदार पलटवार करताना विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. विनायक राऊत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जातं नाहीत, कार्यक्रम असो आगार कोणताही कार्यक्रम, त्यांची ‘बॅग’ तयार ठेवावी लागते अशी थेट शरसंधान केले आहे.
यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले असून ट्विटद्वारे त्यांनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. “आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊतवर गंभीर आरोप केले, विनायक राऊत निवडणूक असो व कार्यक्रम त्याला ‘बॅग‘ द्याव्या लागतात. कोकणाचं नाव खराब केलं या माणसाने, त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी हे विनायक राऊत यानी स्पष्ट करावे.” असे त्यांनी ट्विट केले आहे.