खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022 चा दुसरा दिवस
बॅडमिंटनमध्ये पहिल्या विजयाचे दर्शन
मुंबई, : पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये बॅडमिंटनच्या
मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचे दर्शन घडले. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम
कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा
शनिवार दुसरा दिवस होता.
दर्शन पुजारीने (मुंबई) सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. थांगम त्याचा अंदाज घेत होता. परंतु
लगेच महाराष्ट्राच्या दर्शनने दोन गुण घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी त्याने वाढवत नेली.
थांगमला त्याने डोके वर काढू दिले नाही. दर्शनने पहिला सेट (२१ विरूद्ध १०) जिंकून सामन्यात आघाडी
घेतली. फोरहँड आणि बॅकहँड हे दोन्ही फटके तो लीलया मारत होता. खास करून त्याने स्मॅश जास्त मारले.
पहिला सामना हरलेला थांगम दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे गुणफलक १९ विरूद्ध ७ असा झाला.
काही चुकीचे फटके मारल्याने थांगमला गुण मिळाले. परंतु सरळ सेटमध्ये दर्शनने त्याचा पराभव केला.
दोन्ही सेट त्याने २१ विरूद्ध १० आणि २१ विरूद्ध १० अशा फरकाने जिंकले.
हैदराबादला सराव
मुंबईचा रहिवासी असलेला दर्शन पुजारी हा हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद यांच्या
अकादमीमध्ये सराव करतो. त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा आहे. सामन्यानंतर त्याने तसा
निश्चय बोलून दाखवला.