Ultimate magazine theme for WordPress.

0 66

विशेष लेख क्र:- 26/2023 दिनांक :- 28 जुलै 2023

सेंद्रिय शेती : जाणून घ्या सेंद्रिय खतनिर्मितीच्या पद्धती

शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडीत आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी. त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता व्यवस्थित होती. परंतु मध्यंतरीच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली व आता त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाल्याच आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणाऱ्या घटकांची आपण पुढीलप्रमाणे माहिती घेऊ या.
1) पाचटापासून गांडूळ खत, 2) निंबोळी अर्क 3) नाडेफ कंपोस्ट 4) बीजामृत 5) हिरवळीची खते 6) दशपर्णी अर्क 7) बायो-डायनॅमिक कंपोस्टपाचटा पासून गांडूळ खत.
पिकाचे उत्पादन कमी होण्याची जी महत्त्वाची कारणे आहेत त्यापैकी सेंद्रिय पदार्थांचा अभाव असल्याने शेतकरी रासायनिक खतांचा सर्रास व अतिरेकी वापर करू लागले आहेत. त्यास जोड म्हणून पाण्याचाही अतिरेकी वापर होऊ लागला आहे. त्यामुळे काही भागांतील जमिनी सध्या अक्षरशः ओसाड बनल्या आहेत. त्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात श्रम, पैसा खर्ची पडणार आहे.
गांडूळ खतनिर्मिती :
जागेची निवड व शेड उभारणी : गांडूळ खतनिर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता शेतावर उपलब्ध असणाऱ्या वस्तू बांबू, लाकडे, उसाचे पाचट यांचा वापर करावा. त्याची मधील उंची 6.5 फूट; बाजूची उंची 5 फूट व रुंदी 10 फूट असावी. छपराची लांब आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या उसाच्या पाचटानुसार कमी-जास्त होईल. अशा छपरामध्ये मध्यापासून 1-1 फूट दोन्ही जागा सोडून 4 फूट रुंदीचे व 1 फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूने प्लॅस्टर करावे. तसेच खालील बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी (व्हर्मीवॉश) तळाशी पाइप टाकावा. वाफे तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी 8-9 इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत. खड्यातील माती चांगली चोपून टणक करावी.
पाचट कुजविणे : छपरामध्ये खोदलेल्या चरांमध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे व त्याची उंची जमिनीपासून/वीट बांधकामापासून 20-30 सेंमी ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरीया 8 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो व ताजे शेणखत 100 किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाला 5-10 सेंमी थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरीया, सुपर फॉस्फेट द्रावणास पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धक एक टनास एक किलो या प्रमाणात प्रत्येक थरावर थोडेसे वापरावे. अशा पद्धतीने खडा/वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे व पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने झाडून टाकावे. दररोज त्यावरती पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल. शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी 2 हजार हसिनिया फोटेडा जातीची गांडूळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांनी उसाच्या पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार झाल्याचे दिसेल.
गांडूळ खत तयार झाल्याची चाचणी : सर्व पाचटापासून अंडाकृती लहान विफेच्या गोळ्या झाल्याचे दिसून येते, गांडूळ खताचा सामू सातच्या दरम्यान असतो, गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो, खताचा रंग गर्द काळा असतो, कार्बन : नायट्रोजन गुणोत्तर 15-20:1 असे असते.
चांगले गांडूळ खत :कार्बन नायट्रोजन गुणोत्तर 16:1, नत्र प्रमाण 2.49 ते 3.59 टक्के, स्फूरद प्रमाण 0.89 ते 2.28 टक्के, पालाश प्रमाण 0.44 ते 8.21 टक्के, सेंद्रिय कार्बन 23 टक्के, याशिवाय नत्र, स्फुरद स्थिर करणारे जिवाणू तसेच बुरशी असते.
गांडूळ खताचे फायदे :1) जमीन : जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते. जमिनीत हवा खेळती राहते. जमिनीचा सामू सातच्या आसपास योग्य पातळीवर राखला जाते. जमिनीची धूप व बाष्पीभवन कमी होते. 2) झाडे व किडे : पिकांना सर्व प्रकारचे अन्नघटक सहज व योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. पिकांची जोमदार वाढ होऊन कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. मिळालेल्या उत्पन्नाचा दर्जा उत्तम प्रतीचा असतो. फुले, फळे, भाजीपाला यांची टिकाऊ क्षमता वाढते. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांत माल पाठविणे शक्य होते. 3) शेतकरी : जमिनीचा पोत सुधारल्याने उत्पादन वाढते. पाण्याची बचत होते. त्यावर येणारा खर्चही वाचतो. उत्पादित मालाचा दर्जा चांगला असल्याने बाजारभाव चांगला मिळतो. 4) पर्यावरण : पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. 5) देश : रासायनिक खते आयातीसाठी येणारा खर्च कमी होतो. प्रदूषणविरहित मालास परदेशात मागणी असल्याने परकीय चलनही मिळते.

मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे
००००००००

Leave A Reply

Your email address will not be published.