जन्मासी येऊनि पहावी ही पंढरी!
आषाढी एकादशीनिमित्त विशेष लेखमाला
भाग -१
भूतलावरील साक्षात वैकुंठ म्हणजे पांढुरंगपल्ली, पंढरंगे अर्थात आताचे पंढरपूर ,भक्तांची दक्षिणकाशी, जिथे हिंदूचे पुजनीय व संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विष्णुचे अवतार श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून भक्तांच्या उद्धारासाठी युगे आठ्ठावीस विटेवर उभे आहेत.
विटेवर उभा म्हणून विठोबा, विटेचे स्थल म्हणून विठ्ठल, अश्या नावाने पांडुरंगाला संबोधले जाते.
प्राचीन काळी दुष्ट , पातकी व आई-वडिलांना छळणाऱ्या पुंढलिकाला जेव्हा पश्चात्ताप होऊन आई-वडिलांपेक्षा मोठे दैवत कुणीही नाही याची जाणीव होते व तो त्यांच्या सेवेत स्वतःला समर्पित करतो त्याच वेळेला
विष्णुवर भाळलेली पूर्व जन्मीची इंद्राची भार्या सूची द्वापार युगात राधा बनून कृष्णा सोबत रासलीला करते .,,,,,,,,,,,,,
म्हणून कृष्णावर रूसून रूक्मिणी भिमानदीच्या (चंद्रभागा) तिरावर तपश्चर्येला बसली असता तीची समजूत काढायला शोधत देव तिथे येतात, त्यावेळी पुंढलिका बद्दल त्यांना माहिती मिळते, जाताना त्याला भेटून जावे म्हणून देव त्याच्या झोपडी बाहेर येऊन हाक मारतात, देवाला पाहून पुंडलिक धन्य होऊन गहिवरुन जातो पण आई-वडिलांच्या प्रार्त्यविधीत थोडा अवधी लागेल म्हणून देवाला आपल्या जवळच असलेली विट अंगणात टाकुन त्यावर उभे राहुन वाट पाहायला विनवणी करतो, जेणेकरुन देवाच्या पायाला चिखल लागणार नाही.
देव त्याचा भोळा भाव बघून प्रसन्न होतात व भोळ्या भक्तासाठी कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहतात,
देवाला वाट पाहून घटका सरुन गेली पण पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून रूक्मिणी सुद्धा काही अंतरावर वाट पाहू लागली, एव्हाना हा प्रकार पाहण्यासाठी खूप जनसमुदाय जमला होता, त्यातील एक गृहस्थ झोपडीत डोकावून पाहतो तर पुंडलिकाचे आई-वडिल मृत पावले होते आणि त्यांच्याच शेजारी लीन होऊन पुंडलिकानेही आपले प्राण त्यागले होते.
पांडुरंगाने दिव्य-दृष्टीने ही गोष्ट जाणून पुंडलिकाच्या आत्म्याला पाचारण करून म्हणाले ” पुंडलिका साक्षात वैकुंठ निवासी नारायण तुझ्या दाराशी उभे असताना तु आई-वडिलांच्या सेवेला श्रेष्ठ मानलस, धन्य तुझी मातृ-पितृ भक्ती, जो कुणी माता-पित्याची सेवा करील त्याला कुठंलच तिर्थ, कोणताही देव पुजायची गरज नाही, मी तुझ्यावर प्रसन्न आहे माग तुला काय वरदान पाहिजे !
सद्गगदित होऊन पुंडलिक म्हणाला देवा तुझ्या दर्शनाने माझ्या सारख्या पाप्याचा जन्म सफल झाला, पण भूतलावरील असंख्य जिवांचा उद्धार होण्यासाठी आपण इथेच राहावे .
देव म्हणाले पुंडलिका तुझी अपार भक्ती आणि जनकल्याणाचे विचार बघून मी अतिप्रसन्न आहे, भक्तांमध्ये तु माझा सर्वश्रेष्ठ भक्त मानला जाशील , माझ्या कोणत्याही पूजेमधे पहिले तुझे नाव घेतले जाईल, तुझ्या इच्छेसाठी सर्व जातीच्या, सर्व पंथाच्या उच-निच, गरीब श्रीमंत सर्वाच्या कल्याणासाठी मी अखंड इथेच या विटेवर अठ्ठावीस युगे उभा राहीन, हे पंढरपूर हेच आता वैकुंठ.
असे वरदान देऊन पांडुरंग आणि रूक्मिणी स्वदेही पाषाणमुर्तीत रूपांतर होऊन अंतर्धान पावले.
तेथे जमलेले लोक हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि हर्षने, एकमुखाने म्हणू लागले
"बोला पुंडलिका, वर दे हारी विठ्ठल !
रखुमाई पांडुरंगा, वर दे हारी विठ्ठल !!
आज ह्या ठिकाणी, आता भव्य-दिव्य स्वरूपात मंदिर उभे आहे, त्याचे साल सांगणे अवघड असले तरी इतिहासकारांच्या मते मंदिराची पुनर्बांधणी शालिवाहन वंशातील राजा प्रतिष्ठान याने इ.स. ८३ ला केली.आज हजारो वर्षापासून देवाच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागलेली असते,
वर्षातील चार प्रमुख एकादशी आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री ह्या दिवशी मोठ्या यात्रा भरतात त्यात प्रामुख्याने सर्वात मोठया आषाढी एकादशीला १५ ते २० लाखांचा आकडा पार करते
पंढरीची वारी अगदी प्राचीन काळापासून म्हणजे संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज्यांच्या पूर्वजांपासुन चालू आहे, नित्य नेमाने वारी करणाऱ्यांना वारकरी म्हणतात, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माला आणि मुखात विठ्ठलाचे नाव ही त्यांची ओळख, वारीला व हा भव्य दिव्य सोहळा बघण्यासाठी देश-विदेशातील लोक येतात, टाळ, मृदंगाच्या तालात अभंग गात मोठ्या हर्षाने नाचत वारकरी पंढरीच्या माऊलीला भेटतात तो आनंद स्वर्गसुखाहुन मोठा असतो, देव सुद्धा आपल्या भक्तांना लेकरांसारखा कवटाळून घेतो म्हणूनच विठोबाला विठाई सुद्धा म्हणतात, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव,तुकाराम,चोखा,गोरा,सावता,जनी,सखु ,कान्होपात्रा घेऊ तितकी नावे कमी आहेत, ह्या सर्व भक्तानी पांडुरंगा वरील आपल्या भक्तीचे दाखले दिलेत आणि देवानेही वेळोवेळी भक्तांची लाज राखुन प्रचिती दिली पण उलेखनीय म्हणजे भागवत धर्माच्या पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण जगाला ज्ञानामृत देणारे ज्ञानेश्वर माऊली आणि आपल्या अभंग गाथांनी सर्वांना हरीमार्ग दाखवून सदेही वैकुंठाला जाणारे तुकाराम महाराज, म्हणूनच म्हणतात …..
ज्ञानदेवे रचिला पाया
तुका झालासे कळस
वारी म्हणजे भक्तांची पर्वणी, मोक्षाचे खूले द्वार, एक अमृतुल्य सोहळा जणू स्वर्गाची वाट
| पवित्र क्षेत्र पंढरी चंद्रभागा तीरी |
|| वसुंधरेवरी स्वर्गीय देवनगरी ||
| अपव्यय सव्य दोन्ही कर कटेवरी |
|| अठ्ठावीस युगे विठू उभा विटेवरी ||
| प्रतिवर्षी भक्तजन जे करती वारी |
|| जन्ममृत्यू फे-यांतूनी तो सोडवी तारी ||
| नित्य वदा विठ्ठल विठ्ठल जय हरी |
|| नित्य वदा विठ्ठल विठ्ठल जय हरी ||
| तुझ्याप्रति भक्ती पुण्य रामकृष्ण हरी |
|| जन्मासी येऊनि पहावी ही पंढरी ||
-अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४