जासई विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेज जासई, तालुका उरण या विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचे उद्घाटन कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री व स्थानिक व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांच्या हस्ते पूजन करून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.
या फेरीमध्ये इयत्ता आठवी ते अकरावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही प्रभात फेरी जासई मधून गावभर फिरून परत माघारी विद्यालयांमध्ये आणली गेली.विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा तसेच देश प्रेमावर घोषवाक्य फलक देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देश प्रेमावर घोषणा देऊन तसेच देश प्रेमावर विविध देखावे ,वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,शहीद भगतसिंग व राजगुरू तसेच रणरागिनी ताराबाई यांची वेशभूषा केलेला देखावा गावातील लोकांचे लक्ष आकर्षण करून घेणारा होता.या प्रभात फेरीसाठी जासई ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच संतोष घरत, माजी सभापती नरेश घरत,ग्रामसेवक,तसेच उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील श्रीमती अनिता काटले या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.
या विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,देश प्रेमावरील गीत गायन स्पर्धा, विद्यार्थ्यांना उद्बोधन व मार्गदर्शनाचे असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत .या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख, गुरुकुल विभाग प्रमुख म्हात्रे जी.आर .सर,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख शिंदे एस. एस. व विद्यालयातील इतर सर्व सेवकवर्गांचा हिरीरीने सहभाग मिळत आहे.