जिल्हाभर अतिमुसळधार पाऊस ; दरड प्रवण गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड
205.00 मिमी , दापोली 145.00 मिमी, खेड 74.00 मिमी, गुहागर 77.00 मिमी, चिपळूण 169.00 मिमी, संगमेश्वर 210.00 मिमी, रत्नागिरी 69.00 मिमी, राजापूर 122.00 मिमी,लांजा 342.00 मिमी.
रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 05 जुलै 09 जुलै 2022 रोजी या कालावधीसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पाच दिवसात दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी. ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्जुना प्रकल्प परिसरात दिनांक 04 जुलै 2022 रोजी 326 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस झाला . सदर पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहत उजव्या कालव्यामध्ये शिरले आहे. सदर पाणी काव्यातून वाहत होते. तथापि पाण्यासोबत वाहत आलेला पालापाचोळा
कालव्याच्या किलोमीटर 17 च्या उर्ध्व बाजूस असलेल्या जाळी trash rack ला अडकला गेला. त्यामुळे प्रवाहाला अडथळा होऊन कालव्यामधून वाहणारे पावसाचे पाणी अडवले गेले. त्यामुळे कालव्याला लागून अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या चेंबरच्या भिंतीवरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे कालव्याचे तसेच
बाजूच्या शेतीचे अंशतः नुकसान झाले आहे.अशी माहिती नियंत्रण कक्षात प्राप्त झाली आहे.
खेड तालुकयातील मौजे दाभिळ मध्ये संतोष चव्हाण यांच्या घरावर दरड कोसळली आहे. जिवीत हानी नाही. घर पूर्णत: क्षतिग्रस्त झाले आहे. गुहागर तालुक्यात मौजे अबलोली येथील 2 घरांचेअंशत: नुकसान झाले आहे. कुंभार्ली घाटात देखील दुपारी दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 05 जुलै 2022रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात दरडग्रस्त भागातील मौजे डोरसई येथील 3 कुटूंब नातेवाईकांजवळ हलविणेत आले आहेत. मौजे कुंभवे ता. दापोली येथील अजित अशोक गावखडकर वय 40 वर्षे हे विजेच्या धक्क्याने मयत झाले आहेत. खेड तालुक्यात मौजे खेड-शिवतर रस्त्यावर दोन झाडे पडली होती. सदरची झाडे तात्काळ बाजूला
करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मौजे रसाळगड व रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मौजे खोपी येथील 7 कुटूंबातील 24 व्यक्तींना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आलेले आहे.4. खेड
नगरपालिका क्षेत्रातील एकूण 37 कुटूंबातील 100 व्यक्तींना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आलेले आहेत. यापैकी नगरपालीका क्षेत्रातील 8 कुटूंबांना एल पी हायस्कूल येथे हलविण्यात आलेले आहे. खेड शहरातील मच्छीमार्केट मध्ये पुराचे पाणी आल्याने 8 व्यवसायीकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील मौजे पेढे दुर्गवाडी व बौध्दवाडी येथील दरडप्रवण क्षेत्राजवळील 4 कुटूंबे 30
व्यक्ती यांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आली आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथील वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने (आंबडस –चिरणी) वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे गोदवली येथे झाड पडले असल्यामुळे विजेचा खांब पडला. कोणतीही जिवित हानी नाही. दरड प्रवण गावांची नावे -पांगरी, ओझरे बुदुक, तिवरे घेरा प्रचितगड, नायरी, कसबा
संगमेश्वर (पारकवाडा शास्त्री पूल), आंबेड खुर्द, मुर्शी साखरपा, कुळये, देवळे घेरा प्रचितगड, शिवणे, काटवली डिंगणी कुरण या गावांमधील एकूण 27 कुटूंबे 102 व्यक्ती यांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील मौजे गणपतीपुळे येथील रस्त्यावरती जुने पिंपळाचे झाड पडले. कोणतीही जिवीत हानी नाही.स्थानिकांच्या मदतीने सदर झाड बाजूला करण्यात आले आहे. चांदेराई बाजारपेठेतील पुलाच्या खालील पाणी ओसरले आहे.
राजापूर तालुक्यातील मौजे जवळेथर येथे दरड कोसळली असून तेथील व पूरग्रस्त भागातील 4 कुटुंबे 9 व्यक्ती व 7 जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मौजे खंडेवाडी येथील 29 कुटुंबे 120 व्यक्ती यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.