पावनजीक कुर्धेतील ठिकाण बेहेरेसह जांभूळ आड परिसरात संचार
वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी
पावस : रत्नागिरी तालुक्यातील ठिकाण बेहेरे व जांभूळ आड परिसरात सध्या गवा रेड्याचे संचार करण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरातील शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे वन विभागाने त्याची दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी आंबा बागायतदार व शेतकरी यांच्याकडून होत आहे
या परिसरामध्ये या पूर्वी बिबट्याने अनेकांवर हल्ले करून दहशत निर्माण केली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यांना फिरणे मुश्कील बनले होते. परंतु, सध्या बिबट्याने माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण कमी केल्याने थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, काही प्रमाणात मुक्या प्राण्यांवर अजून हल्ले होत आहेत. असे असताना सध्या गवा रेड्यांनी आपला मुक्काम या परिसरात सुरू केल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण बागायतदारांचे कलमाना घासून त्याचे नुकसान करत आहे त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. या बाबत वनविभाग अधिकार्यांना कळविण्यात आले आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे त्याचा परिणाम नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात येथील शेतकरी श्री प्रसाद बेहेरे म्हणाले की सध्या अचानक पणे गवा रेड्याने या भागात संचार सुरू केल्यामुळे हापूस आंब्याची कलमे राजरोसपणे मोडत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी संचार असल्याने त्याबाबत काहीच कळत नाही तरी वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहोत.