कृषी विभागाकडून लाभ घेण्याचे आवाहन
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : कृषी विभाग रायगड जिल्हा परिषदेकडील केंद्र, राज्य पुरस्कृत व जिल्हा परिषदेच्या सन २०२२ _२३ सालासाठी सेस योजना शेतकऱ्यांसाठी मंजूर झाल्या आहेत. या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावरील पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी, विस्तार आधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एल.के.खुरकुटे यांनी केले आहे.
दरम्यान सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन उरण पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी ईश्वरचंद्र चौधरी व विस्तार अधिकारी प्रतिमा गोरे यांनी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केले आहे. यात राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन सुविधा करण्यासाठी अनुसूचित जाती, नव बौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग ,पंप सेट ,वीज जोडणी ,शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक संच, तुषार संच आदी योजना मंजूर आहेत. तर राज्य शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर, जुनी विहीर ,दुरुस्ती, इनवेल, बोरिंग, पंपसेट, वीज जोडणी, शेततळ्याच्या साठी प्लास्टिक अस्तरिकलरण , सूक्ष्म सिंचन, ठिबक संच, तुषार संच ,पाईपलाईन, परसबाग आदि योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरी बांधण्याकरिता रक्कम रुपये २५०००० देय पर्यंत अनुदान आहे. दरम्यान जिल्हा परिषद सेस मधून सर्वांकष पीक संरक्षण योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानाने पीक संरक्षण, औषधाचा पुरवठा तसेच शंभर टक्के अनुदानातून महिला बचत गट ,शेतकरी गट यांना कडधान्य तसेच भाजीपाला बियाण्याचे मिनी किट, रब्बी उन्हाळी हंगामात ५० टक्के अर्थसहाय्याने भुईमुगाचे बियाणे त्याचबरोबर शेतकऱ्यांची पूर्ण संमती घेऊन खरेदी केलेल्या ताडपत्री वर ७५ टक्के अनुदान ,७५ टक्के अनुदानातून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे घरगुती दीप संच, शेतीविषयक सुधारित अवजारे याच योजनेतून भाजीपाला लागवड प्रोत्साहन योजना, सेंद्रिय शेती प्रोत्साहन म्हणून जीवामृत व बिजामृत तसेच कंपोस्ट खत निर्मिती व गांडूळ खताची निर्मितीही ७५ टक्के अनुदानातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. तर ७५ टक्के अनुदानातून भाजीपाला फळ पिके लागवडीसाठी मच्लिंग पेपरचा वापरही करता येईल असेही सांगण्यात आले.