उलवे नोड येथे भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन
- लाईव्ह दांडिया नाईट्स आणि भरघोस बक्षिसांची लयलूट
- कामगारनेते महेंद्र घरत यांच्यावतीने दिमाखदार आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे) : हिंदू धर्मातील पवित्र सण शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत आहे. नवरात्रौत्सव आणि दांडिया रास गरबा हे एक स्वतंत्र समीकरण असून उलवेवासियांना गरब्याचा आनंद लुटता यावा यादृष्टीने यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगारनेते महेंद्र घरत यांच्या सौजन्याने प्लॉट नं ११४, सेक्टर १८, उलवे नोड येथे भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ३ ऑक्टोबरपासून ११ ऑक्टोबर पर्यंत यमुना सामाजिक-शैक्षणिक संस्था क्रीडांगणात गरबाप्रेमींसाठी सलग ९ दिवस लाईव्ह दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.खास आकर्षण म्हणजे रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यादरम्यान “देवकी मीडिया-साहिल रेळेकर” प्रस्तुत “जल्लोष नवरात्रीचा” या धमाकेदार लाईव्ह दांडिया नाईट्सच्या माध्यमातून गायक सायबा ओव्हाळ, नवीन मोरे, तारका रसाळ व नैना गुरव, तालवादक के अलंकार व समुह, साउंड इंजिनिअर नितेश यांचा बहारदार कलाविष्कार दांडियाप्रेमींना ठेका धरायला लावणार आहे. पारंपारिक भक्तिगीते, भावगीते, हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, बॉलिवूड, भोजपुरी, लोकगीते, कोळीगीते आदी गीत संगीताच्या तालावर नवरात्रौत्सवाची रंगत गरबाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
गरबा आणि दांडियाप्रेमी नवरात्रौत्सवाची अतुरतेने वाट पाहत असतात. नृत्याचा आनंद घेण्यासाठी तरूणाईसह महिलांना अधिक आवड असते. पारंपारीक वेशभूषेत थिरकण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. दांडियाप्रेमींचा उत्साह वाढवण्यासाठी व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांच्यावतीने भरघोस बक्षिसे दिली जाणार असून उलवे, शेलघर परिसरातील गरबाप्रेमींनी दररोज मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाईव्ह दांडिया नाईट्सचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वैभव पाटील ९८१९३२५५५४, रोहित घरत ८३६९०२६२११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.