Ultimate magazine theme for WordPress.

दापोलीत सायकल फेरीद्वारे जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिन साजरा

0 171

दापोली : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलचं महत्त्व व आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार २ जून २०२४ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.

या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, उदयनगर, लष्करवाडी, आनंदनगर, बर्वेआळी जालगाव, पांगारवाडी, नर्सरी रोड, आझाद मैदान असा ७ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या सायकल फेरी दरम्यान पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी राबवलेल्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी अनेक उपक्रमांबद्दल माहिती जाणून घेण्यात आली. टाकावू कचऱ्यापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू पाहिल्या. स्वच्छतेची सुरवात आपल्या स्वतःच्या घरापासून करा, सर्व प्रकारचा सुका कचरा, संकलन केंद्रात जमा करा. ओल्या कच-याचे कंपोस्ट खत करा आणि आपले घर परिसर कचरा मुक्त ठेवा असे सर्वांना आवाहन करण्यात आले. सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, अमोद बुटाला, महेश्वरी विचारे, वैभवी सागवेकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.