डीवाय. एस.पी., पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना ९ ते २३ नोव्हेंबर कालावधीसाठी अधिकार प्रदान
रत्नागिरी, दि. ८ : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी अधिकार प्रदान केल्याबाबतचे नियमन आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले आहेत.
दिनांक १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांनी पूर्ण जिल्ह्यात या आदेशाद्वारे ९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वरील कलमांन्वये खालील अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने वर्तणूक किंवा वागणूक ठेवावी या विषयी निर्देश देणे. कोणत्या मिरवणुका कोणत्या मार्गाने कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग किंवा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांचे आसपास उपासनेचेवेळी वा कोणत्याही रस्त्यावरुन वा सार्वजनिक जागी वा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असल्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्यावर वा धक्क्यामध्ये वा सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत ढोल, ताशे व इतर वाद्ये
वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे वगैरेचे नियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ कोणत्याही सार्वजनिक करमणुकांच्या ठिकाणी
ध्वनी क्षेपकांचा (लाऊड स्पिकर) उपयोग करण्याचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कर्कश लाऊड स्पिकर लावून लोकांना उपद्रव होण्याची शक्यता असते, त्याकरीता नियमन करणे आवश्यक असते. सक्षम प्राधिकाऱ्याने या अधिनियमनाची कलमे ३३,३५,३८ ते ४१,४२,४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे.
जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यावरील वरिष्ठ अधिकारी यांना वरील कलमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार या आदेशान्वये देण्यात आलेले आहेत. प्राप्त अधिकारांचा योग्य विनियोग करुन आपआपले पोलीस ठाणेचे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखावी व कोणताही अनुचित प्रकार
घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.