Ultimate magazine theme for WordPress.

स्ट्रेस ई. सी. जी टेस्ट : हृदयाची कार्यक्षमता समजण्याचे एक वरदान

0 39


 

चालताना-जिना चढताना धाप लागणे, छातीत व पाठीत दुखणे, डावा हात दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, चक्कर येणे, पायांवर सूज येणे ही हृदयविकाराची लक्षणे आपल्याला माहित आहेत परंतु ही लक्षणे दिसू लागल्यास ती नक्की हृदयविकाराशी संबंधित आहेत का ? हे जाणून घेण्यासाठी स्ट्रेस ई. सी. जी टेस्ट ही एक अत्यंत महत्वाची तपासणी मानली जाते. यामध्ये  VO2 max, हृदयाची व्यायाम  कार्यक्षमता व हृदयाला तणावाच्या स्थितीत होणारा रक्तपुरवठा या गोष्टींची सविस्तर माहिती मिळते.

VO2 max म्हणजे काय?
संपूर्ण शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा करणे हे हृदयाचे प्रमुख कार्य आहे. ते जर काही कारणाने व्यवस्थित होत नसेल तर फुफ्फुसांवर ताण येऊन जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी नैसर्गिकच श्वसनाची गती वाढवली जाते. काही वेळा हृदयाचे ठोकेही वाढवले जातात जेणेकरून जास्तीत जास्त रक्तपुरवठा व्हावा. VO2 max म्हणजे एकावेळी शरीराला हृदयाकडून किती प्रमाणात रक्तपुरवठा होतो याचे मोजमाप होय. VO2 max वर हृदयाची कार्यक्षमता ठरवली जाते. जितका VO2 max चांगला तितके हृदय जास्त सुदृढ.

इस्चेमिक चेंजेस
स्ट्रेस टेस्ट करताना तणावाच्या स्थितीत हृदयाला रक्तपुरवठा कमी पडू लागला तर विशिष्ठ प्रकारचे बदल कॉम्प्युटर स्क्रीन वर दिसू लागतात. अशावेळी टेस्ट थांबवली जाते व ते बदल रेकॉर्ड केले जातात. जर हृदयाला तणावातही रक्तपुरवठा योग्य होत असेल तर असे बदल न येता टेस्ट नॉर्मल येते.

स्ट्रेस ई. सी. जी टेस्ट कशी केली जाते?
ही टेस्ट घेण्यापूर्वी बी.पी. रँडम ब्लड शुगर, हार्टरेट, ई. सी. जी. असे जनरल चेक अप केले जाते. पंधरा मिनिटांची ही टेस्ट मॉडिफाइड ब्रूस प्रोटोकॉल नुसार केली जात असून ट्रेडमिलवर वर चालवून केली जाते त्यामुळे या टेस्ट ला ट्रेडमिल टेस्ट असेही म्हणतात. सातत्याने बी.पी. हार्टरेट, SpO2 व ई. सी. जी. मध्ये होणारे बदल रेकॉर्ड केले जातात.

ही टेस्ट कोण करून घेऊ शकतो?

उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, ब्लॉकेजेस असणारे रुग्ण ही टेस्ट करू शकतात. गर्भिणी, तीव्र मणक्याचे विकार, हृदयाच्या झडपांचे दोष इ. व्यक्तींना ही टेस्ट करता येत नाही. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अपरिहार्य आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास झालेले रुग्ण वैद्यकीय सल्ल्याने ही टेस्ट करू शकतात. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या हृदयाची कार्यक्षमता जाणून घेण्याची इच्छा आहे असे निरोगी व्यक्तीदेखील  ही टेस्ट करू शकतात. सुंदर आयुष्य जगण्यासाठी निरोगी शरीर गरजेचं आहे आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी शरीराला रक्तपुरवठा करणारा अवयव म्हणजेच हृदय फिट पाहिजे. म्हणून हृदयाची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी स्ट्रेस टेस्ट करणं खूप महत्वाचे आहे.

-डॉ. मृदुला गुजर, चीफ कन्सल्टन्ट, माधवबाग, रत्नागिरी.

Leave A Reply

Your email address will not be published.