- ड्राईव्ह इनच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पाककला स्पर्धेत विक्रम
- ३४ स्पर्धाकांचा पाककला स्पर्धेत सहभाग
संगमेश्वर दि. १९ : दि ड्राईव्ह इन रेस्टॉरंट धामणी, संगमेश्वर च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त दी ड्राईव्ह इन रेस्टॉरंट प्रायोजित तसेच कोंकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था, कोकण प्रांत आणि लायन्स क्लब संगमेश्वर आयोजित पाककला स्पर्धा नुकत्याच ड्राईव्ह इन लॉन्स धामणी येथे संपन्न झाल्या.
यावर्षी सुरणापासूनचे शाकाहारी पदार्थ हा विषय पाकसिद्धी स्पर्धांसाठी निश्चित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रायोजक अमोल लोध यांनी या स्पर्धा आयोजना मागचा उद्देश सांगितला, “दरवर्षी स्थानिक पीक व सहज उपलब्ध घटकांपासून तयार होणाऱ्या पाकसिद्धी येथे स्पर्धा माध्यमातून प्रदर्शित करण्यात येतात. स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे उदात्तीकरण करणे आणि कोकणची खास रेसिपी तयार करून प्रसारित करणे या हेतूनेच या पाकसिद्धी स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. यापूर्वी तांदूळ, कुळीथ, नाचणी इत्यादी विषयांवर पाककला स्पर्धा उपक्रम पार पडले. आत्तापर्यंत अनेक वर्ष स्पर्धकांच्या नंबर आलेल्या पाकसिद्धी लवकरच दी ड्रायव्ह इन रेस्टॉरंट आणि राई कृषी पर्यटन केंद्र गोळवली येथे आस्वादासाठी उपलब्ध असतील. येणाऱ्या ग्राहकांनी कोकणी पदार्थाची खास मागणी करावी. आम्ही सेवेला रुजू आहोतच असे आवाहन लोध यांनी केले.”
पारंपरिक औषधांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये सुरणाचा वापर आढळतो. सुरण हे एक उत्तम हृदय औषध आहे. रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक गुठळ्या होण्यापासून ते प्रतिबंधित करते. रक्तप्रवाह नियंत्रित करते, उच्च रक्तदाब कमी करते, मूळव्याध, दमा, ओटी पोटात दुखणे, संधीवाताची सूज यावर सुरण हे उत्तम औषध आहे. महिलांसाठी हार्मोनल संतुलन सुरणाच्या सेवनाने राखलं जातं. सुरणामध्ये कॅल्शियम, तांबे, जस्त, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज आदी घटकांचा समावेश असतो. सुरणाचा कंद आणि पाला सेवन गुणकारी आहे.
या स्पर्धेमध्ये विविध ठिकाणच्या ३४ स्पर्धकानी नोंदणी केली होती, पैकी २९ स्पर्धकांनी ठरलेल्या वेळेत या स्पर्धेमध्ये सुरणा पासून तयार केलेल्या विविध रेसिपीज मांडल्या होत्या. त्यामध्ये कटलेट, दाबेली, लॉलीपॉप, बर्फी, हलवा, खीर, लाडू, भेळ, चाट, सॅलड, सँडविच, रोल, भाजी, भजी, काप, पॅटीस, कबाब, पराठा यांचा समावेश होता. सुरणापासून तयार केलेल्या २० पदार्थांमध्ये नाविन्य होतं. या पाक सिद्धीचे परीक्षण अभिरुची हॉटेल चिपळूणच्या मालक सौ. विभावरी रविकिरण जाधव आणि दिपराज प्रॉडक्ट्स देवरूखच्या सौ. दीप्ती भिडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. मिनल ओक चिपळूण यांनी आपल्या ओघवत्या शैलीत खाद्य संस्कृतीवर आपले विचार मांडले.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
या पाककला स्पर्धेत सौ. सिद्धी शशांक दामले चिपळूण यांनी सुरणाचे वडे या पदार्थासाठी प्रथम क्रमांक पटकावला तसेच सौ. प्रज्ञा जयंत फडके, पूर्णगड, रत्नागिरी यांनी सुरणाची दाबेली करून दुसरा क्रमांक मिळवला तर नवनिर्माण महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट चा विद्यार्थी अनिकेत सुभाष आमकर यांच्या सुरणाच्या लाडू साठी तिसरा क्रमांक प्राप्त झाला. कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल ओक, याच पर्यटन संस्थेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. विकास शेट्ये, संचालक नंदादीप पालशेतकर, व परीक्षक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं . यावेळी लायन्स क्लब संगमेश्वरचे पदाधिकारी कोळवणकर, विवेक शेरे, गौरी आणि तेजस संसारे तसेच लोध कुटुंबीयांपैकी सी ए माणिक लोध, अमोल लोध आणि लायन्सचे माजी प्रांतपाल उदय लोध यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
लायन्स क्लब संगमेश्वरच्या पदाधिकारी सुरेखा संसारे यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.