शिष्यवृत्ती परीक्षेत निरज इनामदार तालुक्यात प्रथम ; पैसा फंड तर्फे सन्मान
संगमेश्वर दि. १४ ( प्रतिनिधी ) : जिल्हा परिषद शाळा तुरळ सुवरेवाडीचा विद्यार्थी आणि सध्या सहावीमध्ये पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे दाखल झालेल्या निरज मनोज इनामदार याने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम तर रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल आज व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये संस्था सचिव धनजय शेट्ये यांच्या हस्ते निरज याला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून गौरवण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
निरज इनामदार या विद्यार्थ्याचेवडील मनोज हे महाड येथे ज्ञानदीप को ऑप बॅंकेमध्ये सेवेत आहेत तर आई सुवर्णा मनोज इनामदार या प्राथमिक शिक्षिका म्हणून धामापूर नंबर दोन या शाळेत कार्यरत आहे. निरज याला आई – वडिलांसह तुरळ सुवरेवाडीतील शिक्षक संदीप काशीनाथ कुंभार यांनी चौथी आणि पाचवीच्या वर्गात अनमोल असे मार्गदर्शन केले. दररोज सकाळी ९ वाजता शनिवार – रविवार आणि सुट्टीच्या दिवशी जादा तास घेऊन कुंभार गुरुजींनी आपल्याला मार्गदर्शन केल्याचे निरज याने सांगितले. याबरोबरच पहिली ते तिसरीच्या वर्गात दुर्गा भोजने बाई यांनी आपल्याला मार्गदर्शन केले होते.
दररोज सायंकाळी आणि सकाळी लवकर उठून शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे आपला अभ्यास कधीही अपूर्ण राहिला नाही असे मनोजने सांगितले . एखाद्या प्रश्नाबाबत घरी अडचण आली तर आईचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले असेही मनोज याने नमूद केले. संदीप कुंभार गुरुजी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आपण शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात आठवा क्रमांक प्राप्त करु शकलो, या सर्व गुरुजनांबद्दल निरजने नम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. पैसा फंड प्रशालेत आल्यानंतर आपला उत्साह वाढला असून याशाळेतही आपण आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत असेच उज्वल यश मिळवण्याचा प्रयत्न करु असे सन्माना दरम्यान निरज याने प्रशालेला आश्वासित केले आहे.
निरज मनोज इनामदार याच्या उज्वल यशाबद्दल तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रदीप पाटील , विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, कडवई बीटचे विस्तार अधिकारी विनायक पाध्ये, केंद्रप्रमुख जयंत शिंदे, मार्गदर्शक संदीप कुंभार, दुर्गा भोजने, वडील मनोज इनामदार, आई सुवर्णा इनामदार, पैसा फंड इंग्लिश स्कूलचा सर्व कर्मचारी वर्ग आदींनी अभिनंदन केले आहे.