देवरूख महाविद्यालयाच्या ‘आकांक्षा’ वार्षिक अंकाचे प्रकाशन
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘आकांक्षा’ वार्षिक अंकाचा प्रकाशन समारंभ संस्था सचिव शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई,नितीन शेडगे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. एम. आर. लुंगसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील महत्त्वाच्या शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रमांवर आधारित महत्त्वपूर्ण घटनांची तयार केली एव्ही क्लिप दाखविण्यात आली.
प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांना ‘शिक्षणतज्ञ कै. रामभाऊ परुळेकर आणि मुख्याध्यापक कै. बाबुराव परुळेकर शैक्षणिक कार्य पुरस्कार: २०२३’ प्राप्त झाल्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने सन्मानित केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आकांक्षा अंकाचे प्रकाशन केले.
वार्षिक अंक हा महाविद्यालयाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून, याद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळत असल्याचे मत सौ. वेदा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविधांगी लेखनाचे प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन संस्था सचिव फाटक यांनी केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचा अधिकाधिक उपयोग विद्यार्थ्यांनी करून स्वतःला कायम अपडेट ठेवावे अशी भावना प्राचार्य डॉ. तेंडोलकर व्यक्त केली.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या या चौथ्या वार्षिक अंकात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्य यामध्ये विशेष लेख, कथा, कविता यांच्यासह शैक्षणिक व सह-शैक्षणिक विभागांचे अहवाल, वार्षिक परीक्षांचे निकाल, गुणवंत व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची माहिती, विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे फोटो, याचबरोबर संस्था व महाविद्यालयांने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचे माहिती व फोटो, गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे फोटो, महाविद्यालयात नियमित आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रम-उपक्रमांची माहिती व फोटो इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा या अंकामध्ये घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा साळवी यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. सीमा कोरे यांनी केले.