व्यक्तिचित्रणात शरीररचना शास्त्राचा अभ्यास महत्वाचा : चित्रकार शीलकुमार कुंभार
व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक
संगमेश्वर दि. १४ : व्यक्तिचित्रण करण्यासाठी प्रथम स्केचिंग आणि महत्वाचे म्हणजे शरीररचनाशास्त्राचा अभ्यास करणे महत्वाचे असते. कॅनव्हासवर हुबेहूब चेहरा साकारण्यासाठी निरीक्षणाबरोबरच संयम असणे तितकेच महत्वाचे आहे. शाळेत मुलांना मानवी आकार काढायला खूप कठीण जातात यासाठी दैनंदिन स्केचिंग करणे खूप उपयुक्त ठरते. रेखाटनाने उत्तम सराव होतो. यासाठी सराव खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन व्यक्तिचित्रकार शीलकुमार कुंभार यांनी केले.
माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी, जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन जयगड आणि रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जयगड येथे जे एस डब्ल्यूच्या व्होकेशनल सेंटर येथे आयोजित दोन दिवसांच्या कृतीसत्र आणि कार्यशाळेत एम आय टी कॉलेज पुणे येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापक, चित्रकार शीलकुमार कुंभार यांच्या व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित कलाध्यापकांना मार्गदर्शन करताना चित्रकार शीलकुमार कुंभार हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष इमतियाज शेख, उपाध्यक्ष स्वरूपकुमार केळस्कर, सचिव राजन आयरे, सहसचिव तुकाराम पाटील, कोषाध्यक्ष प्रथमेश विचारे, स्पर्धाप्रमुख सुशीलकुमार कुंभार, मोहन बुरटे, उदय मांडे, मुग्धा पाध्ये, युगंधरा तळेकर, मानसी देवघरकर , गजानन पांचाळ, राकेश देवरुखकर, रामचंद्र धुमाळे, रियाज म्हैशाळे, सल्लागार तुकाराम दरवजकर, बसवराज बिद्रीकोटीमठ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जे एस डब्लू फाऊंडेशनने या कार्यशाळेसाठी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल संघटना उपाध्यक्ष स्वरुपकुमार केळस्कर यांच्या हस्ते सीएसआर हेड अनिल दधीच यांचा सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच संपदा धोपटकर यांनी देखील बहुमोल असे सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.
तुकाराम पाटील यांनी व्यक्तिचित्रकार शीलकुमार कुंभार यांच्या कलाप्रवासाविषयीचा सविस्तर आढावा घेतला . पुणे येथील एम आय टी कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या कुंभार यांना आजवर विविध पुरस्कार मिळाले असून त्यांची चित्रे विविध मान्यवरांच्या संग्रही आहेत. व्यक्तिचित्रणाच्या प्रात्यक्षिकाबरोबरच कलाध्यापकांच्या कलाकृतींचे परिक्षण करण्याची जबाबदारी देखील चित्रकार कुंभार यांच्यावर असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले .
व्यक्तिचित्रणासाठी मॉडेल म्हणून ज्येष्ठ कलाध्यापक बिद्रीकोटीमठ यांची निवड करण्यात आली होती. कमी वेळामध्ये अधिकाधिक अचूकता आणत व्यक्तिचित्रण करण्यात शीलकुमार कुंभार यांची विशेष ओळख आहे. जिल्हा कलाध्यापक संघटनेने अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करुन जिल्ह्यातील कलाध्यापकांना एकत्र आणल्याबद्दल चित्रकार कुंभार यांनी समाधान व्यक्त केले . व्यक्तिचित्रण करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे महत्वाचे असते याचा उहापोह करत कुंभार यांनी केवळ तासाभरात ऑइल कलर माध्यमात अप्रतिम असे व्यक्तिचित्र साकारले. उपस्थित कलाध्यापकांनी टाळ्यावाजवून कुंभार यांच्या कलेला दाद दिली.
दुपारच्या सत्रात दीपा सावंत यांच्या नवीन शैक्षणिक धोरण या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम जिंदल विद्या मंदिर येथे संपन्न झाला . नवीन शैक्षणिक धोरणात येणारे बदल आणि त्याला शिक्षकांनी कसे सामोरे जावे याचे उत्तम विवेचन सावंत यांनी केले . रात्रीच्या सत्रात उपस्थित कलाध्यापकांनी आपल्यातील विविध कलांचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली . दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आनापान ध्यानसाधना प्रशिक्षण आणि विपश्यना परिचय सौ. युगंधरा राजेशिर्के आणि संतोष आयरे यांनी करुन दिला. याचा उपस्थित कलाध्यापकांना चांगलाच लाभ झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या . तद्नंतर बालभारतीचे डॉ. अजयकुमार लोळगे यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कलाविषय आणि कलाशिक्षकांची भूमिका याविषयावर मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान संपन्न झाले. चित्रकार संजय शेलार यांच्या हस्ते कार्यशाळेसाठी उपस्थित कलाशिक्षकांच्या चित्रप्रदर्शनात कलाध्यापकांच्या विजेत्या कलाकृतींना पारितोषिके देण्यात आली. सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील मणीपद्म हर्षवर्धन यांचे सुंदर असे व्याख्यान संपन्न झाले.
अखेरच्या सत्रात रत्नागिरी येथील रुपाली लिमये यांच्या कथ्थक नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला .जिल्हा कलाध्यापक संघटनेने कृतीसत्र आणि कार्यशाळेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कलाध्यापकांचे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, चौधरी, जे एस डब्लू फाऊंडेशन या सर्वांना जिल्हा कलाध्यापक संघटनेने धन्यवाद दिले आहेत.