वन विभागाकडून स्पष्टीकरण ; विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन
लांजा : लांजा विलवडे रस्त्यावरील पट्टेरी वाघाचा तो व्हिडिओ बनावट असल्याचे लांजा वन विभागाने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले ठिकाण ठिकाण हे लांजा तालुक्यातील विलवडे रोड नाही, असेही वन विभागाने म्हटले आहे. गतवर्षीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
नागरिकांनी अशा वायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे लांजा वन विभागाने आवाहन केले आहे.
लांजा विलवडे रस्त्याच्या बाजूला एक झोपडीवजा शेड येथून एक पट्टेरी वाघ रस्त्यावरून जात असल्याचा आणि एक वाहन त्या व्हिडिओत दिसत आहे. जवळपास मोराचा आवाज ऐकू येत आहे, असा व्हिडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर वायरल होत आहे. या वायरल व्हिडिओची दखल वन विभागाने घेतली असून वनविभागाच्या आदेशानुसार वन रक्षक श्रावणी पवार यांनी विलवडे लांजा या परिसरात पाहणी केली. मात्र, व्हिडिओतील ते ठिकाण कुठेही दिसून आले नाही. व्हिडिओमध्ये दाखवलेला विलवडे रस्ता आता पूर्णपणे डांबरीकृत झालेला आहे.
गेले दोन दिवस वनविभागाचे वनरक्षक यांनी पाहणी केली. मात्र, पट्टेरी वाघाच्या संचाराबाबत कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. वनपाल दिलीप आरेकर यांनी व्हायरल व्हिडिओ लांजा तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट करीत अशा व्हिडिओवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि फॉरवर्डही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.