- पारंपरिक नदीवरील बांधन पद्धतीचा केला जातो वापर
- मळ्याच्या माशांना बाजारात असते मागणी
चिपळूण : पावसाळा सुरू झाला की, मृग नक्षत्रामध्ये मुसळधार पाऊस पडला की चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची नदी नाल्यावर गर्दी जमा होते. हा काळ प्रजनन काळ असल्याने मासे अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या दिशेने जात असतात. असे मासे पकडण्यासाठी पारंपारिक बांधन बांधली जातात. तर काही ठिकाणी झिला लावून मासे पकडले जातात. मुसळधार पावसात लहान थोर या चढणीच्या माशांना पकडण्याचा आनंद लुटत असतात. चढणीचे मासे पकडण्याची मौज फार वेगळीच आहे.
कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मात्र, या व्यतिरिक्त पावसाळ्यात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत आणि त्यात काहीशी वेगळी मौज असते.
उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कमी होते. अशा वेळी चढणीचे मासे पावसात पकडण्यासाठी अशा नद्यांवर पारंपारिक बांधन शेतकरी बांधतात. म्हणजेच दगडाचा किंवा गवताच्या साह्याने लांबलचक बांध घालून मधी एक पाण्याचा झोत सोडलेला असतो. खाकी एक लांबलचक पाळणा सारखे बांबूपासून बनवलेले साधन लावले जाते. बाकी पाणी अडवले जाते. त्यानंतर ज्यावेळी पावसाळा सुरू होतो तेव्हा चढणीचे मासे याच्यावरून पाण्याचा झोता बरोबर वरती झेप घेत जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी शेतकरी चढणीचे मासे मोठ्या प्रमाणात पकडत असतो तर काही ठिकाणी चढणीचे झिले लावून पकडतात. मृग नक्षत्रामध्ये मुसळधार पाऊस पडला की, चढणीचे मासे अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या दिशेने जातात. अशावेळी हे चढणीचे मासे पकडण्यासाठी नदी नाल्यांवरती मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडते. मळ्याचे मासे, शिंकटी, पालू, पितलांडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडले जातात. पण जास्त मळ्याचे मासे मिळतात. काही शेतामध्ये सुद्धा चढणीचे मासे शिरल्यानंतर लहान मुले हे मासे पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना वेगळाच आनंद मिळत असतो.
शेतकरी पावसाळ्यात शेतीच्या कामातुनही वेळ काढुन चढणीचे मासे पकडण्याची मज्जा तो दिवसा किंवा रात्री घेत असतो.
पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते. मोठ्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे प्रवाह सोबत किंवा पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , शिरतात. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये अंडी सोडण्यासाठी शिरतात. चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो. मुसळधार पाऊस पडल्याशिवाय असे करण्याची मासे चढत नाहीत त्यामुळे ही मुसळधार पावसाची खवय्ये वाट पाहत असतात. मात्र कोकणामध्ये चढणीचे मासे पकडण्याचा एक वेगळा आनंद प्रत्येक जण घेत असतो.