देवरूख : डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील ग्रामीण भागातील रानभाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणात पावसाळी हंगामात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रानभाज्या आपोआप रूजून येतात. या सर्व रानभाज्या पौष्टिक असतात व त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. या सर्व भाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
या रानभाज्या प्रदर्शनात कुरडू, अळू, भारंगी, टाकळा, चूच इ. भाज्या मांडण्यात आल्या होत्या. तसेच रानभाज्यांपासून केलेले वेगवेगळे पदार्थ सुद्धा मांडण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. शितल मनवे यांच्या मार्गदर्शना खाली शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने मेहनत घेतली.