एक व्यक्ती, एक पद नियमाप्रमाणे ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे : नाना पटोले
शिर्डीतील कार्यशाळा काँग्रेस पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी फलदायी ठरेल : बाळासाहेब थोरात
प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेची सांगता
मुंबई, शिर्डी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे मते मांडली व ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का ? असा सवाल विचारत, ते फक्त आदेश देण्याचे काम करतात, असे प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेची सांगता शिर्डीतील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झाली, यावेळी पाटील बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
समारोपप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दोन दिवसाच्या या शिबिरात उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून ‘एक व्यक्ती, एक पद’ नियमानुसार या शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून ही पक्रिया पुढेही चालूच राहणार आहे. सहा विभागांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे कामही केले जाणार आहे. सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधणे, संघटन वाढवणे यावरही विस्तृत चर्चा झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा नक्षलवादी, दहशतवादी आंदोलनजीवी म्हणून अपमान केला त्याचा निषेधही या शिबिरात करण्यात आला. फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली व शिवाजी महाराजांचाही अवमान केला. महाविकास आघाडी सरकारने मात्र सत्ता येताच दिलेले आश्वासन पूर्ण करत सरसकट कर्जमाफी दिली, जनतेला दिलेला शब्द पाळला. हे सरकार शेतकरी, कामगार, दलित, वंचित समाजाच्या हिताचे रक्षण करणारे सरकार आहे.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसाच्या मंथनातून जे सार निघाले आहे त्याचे एक दिशादर्शक पुस्तक बनू शकते. आता याची अंमलबजाणी करायची आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार आहे. त्यानंतर त्याचा उपयोग आगमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितच होईल. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्याअगोदर शिर्डीत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक अधिवेशन पार पडले होते या अधिवेशनात त्यावेळचे मातब्बर नेते सहभागी झाले होते हे अधिवेशन काँग्रेससाठी लाभदायी ठरले तसेच हे अधिवेशनही काँग्रेस पक्षाला फलदायी ठरेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त करून ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.