.उरण (विठ्ठल ममताबादे ): सिटी बेल वृत्त समूह या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध वृत्त समूहाकडून दि. 3 जून 2022 रोजी सायंकाळी 4 वा. पनवेल येथील वीरूपाक्ष मंगल कार्यालय, प्लॉट नंबर 121 बी, रत्नाकर खरे मार्ग, अशोक बाग समोर, अक्षरधाम स्म्शान भूमी जवळ, पनवेल येथे आदर्श लोकसेवक 2022 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध कामगार नेते महेंद्र घरत यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आदर्श लोकसेवक पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.
पनवेल उरण परिसरातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली NMGKS ही संघटना खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. टाळेबंदीच्या कालखंडात तर महेंद्र घरत यांनी एम्ब्युलन्सचा असलेला तुटवडा पाहता चार नवीन रुग्ण वाहीका कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केला. दुर्गम वस्तीवर, आदिवासी वाड्यावर अन्नधान्याचे वाटप केले. जेएनपीटी मधील कामगारांना टाळेबंदी विशेष भत्ता मिळवून दिला. काँग्रेस पक्षाचा तळा गाळात प्रचार व प्रसार केला. पक्षाची योग्य ती मोट बांधून पक्ष रायगड जिल्ह्यात अग्रेसर आणला. काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपदही ते उत्तमपणे सांभाळत आहेत. डिसेंबर 2004 मध्ये नु मेरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आणि या संघटनेने उत्तमोत्तम प्रगती करत गरुडभरारी घेतली. या संघटनेने कधीही मागे वळून पाहिले नाही. अवघ्या दहा वर्षात इंटरनॅशनल ट्रेड फेडरेशन मध्ये सहभाग नोंदविला. जगभरातील 5 लाख कामगार या संघटने खाली एकत्र आले आहेत. कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना अविरतपणे लढत आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांचे आजपर्यंतचे कार्य पाहता व स्वच्छ चारित्र्य संपन्न, मनमिळावू व्यक्तिमत्व, जनते मध्ये असलेली प्रतिमा आदी व्यक्ती गुणांचा विचार करून कामगार नेते महेंद्र घरत यांना आदर्श लोकसेवक 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक विवेक पाटील यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, प्रसिद्ध गायक सागर म्हात्रे, कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील, पनवेल महानगर पालिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत,शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशिनाथ पाटील आदी विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कामगार नेते महेंद्र घरत यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.