संगमेश्वर दि.६ : आपला देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे .या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जातेय . प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या वतीने परिसरातून आज प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी ढोलाच्या गजरात आझादी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घोषणा देण्यात आल्या. प्रभातफेरी मध्ये दहावी मधील अश्विनी शिंदे या विद्यार्थीनीने भारमाता साकारल्याने तसेच विद्यार्थीनींनी एकात्मतेची वेशभूषा परिधान केली होती हा आकर्षणाचा विषय ठरला. प्रभातफेरीत घोषणा आणि विविध प्रकारचे फलकही लक्ष वेधून घेत होते.
यावेळी व्यापारी पैसा फंड संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये , नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर , ग्रामस्थ दादा कोळवणकर , संस्था सचिव धनंजय शेट्ये शाळेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे , शिक्षक नवनाथ खोचरे, किशोर नलावडे आदी शिक्षक वर्ग , ग्रामस्थ , पालक , शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरी मध्ये सहभाग घेतला . पैसा फंड इंग्लिश स्कूल , रामपेठ , बाजारपेठ मार्गे संगमेश्वर बसस्थानक अशा मार्गावरुन ही प्रभातफेरी मोठ्या जल्लोषात संपन्न झाली . प्रभातफेरी दरम्यान पाऊस असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वहात होता .