https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी

0 83

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२ : वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून याविषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी तळेगाव येथे वेदांता फॉक्सकॉन विषयावरून केलेले आंदोलन हा खोटारडेपणा होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी खोटारडी आंदोलने बंद करावीत. अन्यथा ते जेथे आंदोलन करतील तेथे जाऊन आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मा. बावनकुळे यांनी दिला.

बावनकुळे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन कंपनीबाबत एमआयडीसीचे पत्र आपल्याकडे आहे. त्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, त्या कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झालेला नाही आणि कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. अशा स्थितीत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रार खोटारडेपणाची आहे. प्रत्यक्षात आघाडी सरकारने कंपनीशी करार केला नाही आणि जमीनही दिलेली नाही, हे आता उघड झालेले आहे. हा प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याचा हा पुरावा आहे. खोटारडेपणाबद्दल आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी.

त्यांनी सांगितले की, वेदांताच्या विषयावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. या नेत्यांनी जनतेची माफी मागण्यासोबतच ही आंदोलने बंद करावीत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ.

ते म्हणाले की, अतिवृष्टीचे संकट आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला भेट देऊन पाहणी केली. ताबडतोब पंचनामे झाले. आता पूर्व विदर्भाला ११९१ कोटी रुपयांची मदत देण्याचा शासनाचा आदेश आला आहे. आपली अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना आतापर्यंत इतकी मोठी मदत कधीही मिळाली नाही. तसेच शिंदे फडणवीस सरकारने बुलेट ट्रेनच्या तत्परतेने काम केले आहे. आपण भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारचे आभार मानतो.

Leave A Reply

Your email address will not be published.