एक लाखाचा हैद्राबादी बोकड ठरला रत्नकृषी महोत्सवाचे आकर्षण
रत्नागिरीतील रत्नकृषी महोत्सवात विविध प्रकारचे 120 स्टॉल्स
रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडांगणाव आयोजित रत्न कृषी महोत्सवात विविध प्रकारचे 120 तर पशुपक्षाचे 20 स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये जीवन ज्योती बचत गटाच्या करवंटीपासून शोभिवंत वस्तू आणि शाहिद हुशये याचा एक लाखाचा हैद्राबादी बोकड आकर्षण ठरले.
गुरुवारपासून (ता. 19) हा महोत्सव सुरु झाला आहे. उमेदच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. हापूस, पायरी यासह अन्य प्रकारचे विविध आंबे विक्रीला ठेवण्यात आले आहेत. याला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जीवनज्योती बचत गटाने ठेवलेल्या करवंटी पासूनच्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये कॅन्डल होल्डर, अगरबत्ती स्टॅण्ड, कासव, फ्लॉवर पॉट, चमचा, बाऊल, पेन स्टॅण्ड असे विविध वस्तू या महिला बनवत आहेत. चूल पेटवण्यासाठी आपण करवंटीचा उपयोग करायचो पण जिंदल कंपनीने प्रशिक्षण दिल्यानंतर करवंटी पासून टाकाऊ ते टिकाऊ असा उपयोग करता येतो हे समजल्यामुळे आम्हा सर्व महिलांना रोजगार मिळाला अस यावेळी स्टॉलवर असलेल्या महिलांनी सांगितले.
पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये मेहसाण जातीच्या म्हैशी, खिल्लारी जातीच्या बैलजोड्या, टर्की जातीचा पक्षी, फायटर कोंबडा, राजहंस, मिर्ली जातीची कोंबडी, शाही जातीचा बकरा, कावेरी कोंबड्या शेतकर्यांना पहायला ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये शाहिद हुशये या तरुणाने ठेवलेला एक लाखाचा बोकड आकर्षण ठरला आहे. हैद्राबादी बोकडाबरोबरच हैद्राबादी मादी आणि तिची दोन पिल्ले प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. 80 किलोच्या बोकडाचे दोन्ही कान लांबलंचक आहेत. पांढर्या रंगाचा हा बोकड तेवढाच आकर्षक आहे. हा बोकड शाहिद हुशये यांनी विक्रीला ठेवला आहे. बेंगलोर येथून आणलेली बकरी आणि हैद्राबादहून बोकड आणला होता. त्यापासून एक पिल्लू झाले. त्याचे गेली दोन वर्षे संगोपन केल्याचे त्यांनी सांगितले.