वाढत्या गर्दीमुळे जूनपर्यंत अतिरिक्त जोडण्याचा रेल्वेचा निर्णय
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरुन दिवसा तसेच रात्री अशा दोन्ही वेळेत धावणार्या डबल डेकर एक्स्प्रेसचे डबे जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत वाढवण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर विविध स्थानकांवर उतरणार्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने या वातानुकूलित दुमजली गाड्यांना चार अतिरिक्त जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी डबल डेकर एक्स्प्रेस आता 12 ऐवजी 16 डब्यांची धावणार आहे.
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या सर्वच गाड्यांना गर्दी वाढताना दिसत आहे. कोरोनाची बंधने शिथील झाल्यामुळे रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होताना दिसत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे कोकण रेल्वे मार्गावरुन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान दिवसा धावणारी 11085/11086 तसेच रात्री धावणारी 11099/11100 या दोन्ही वातानूलित डबल डेकर एक्स्प्रेसचे गाड्यांना डबे वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्र. 11085 लो. टिळक टर्मिनस ते मडगाव द्विसाप्ताहिक डबल डेकरला दि. 28 एप्रिलपासून 2 जूनपर्यंत तर मडगाव ते लो. टिळक टर्मिनस धावणार्या अप डबल डेकर एकस्प्रेसला (11086) दि. 29 एप्रिलपासून दि. 3 जून 2022 या कालावधीसाठी थ्री टायर एसी श्रेणीचे चार अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.
याचबरोबर याच मार्गावर मुंबईतून रात्री सुटणार्या साप्ताहिक डबल डेकर एक्स्प्रेसला (11099) दि. 30 एप्रिलपासून दि. 4 जूनपर्यंत तर मडगाव – लो. टिळक टर्मिनस दरम्यान धावणार्या (11100) साप्ताहिक डबल डेकर एक्स्प्रेसला दि. 1 मे ते 5 जून 2022 या कालाधवीसाठी अतिरिक्त थ्री टायर एसी श्रेणीचे चार कोच जोडले जाणार आहेत.
