गणेशोत्सवापासून रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथून सोडावी
प्रवाशांचे शिष्टमंडळ घेणारा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट
रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणवासीयांची पसंतीची ठरलेली रत्नागिरी- दादर पॅसेंजर गाडी दिव्या ऐवजी पूर्ववत दादरपर्यंत चालवली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर येथून सोडावी यासाठी प्रवाशांचे एक शिष्टमंडळ लवकरच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटणार आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बंद झालेली रेल्वेसेवा पूर्वपदावर आल्यानंतर कोरोनाच्या नावाखाली कोकणवासीयांची पसंतीची असलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर रेल्वेतील बाबूनी दादर ऐवजी दिव्या वरूनच रत्नागिरीला परत पाठवायला सुरुवात केली.
आता कोरोनानंतरची स्थिती पूर्णपणे नियमित झालेली असताना ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर येथून रत्नागिरीसाठी सोडावी यासाठी रेल्वेचे एक शिष्टमंडळ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना कोकणवासीयांची होणारी गैरसोय निदर्शनास आणून देणार आहे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून ही गाडी दादर येथून रत्नागिरीसाठी सोडले जात होती. मात्र बऱ्याचदा ती कोकणातील मुंबईला येताना उशिरा आल्याच्या कारणास्तव दादर ऐवजी दिव्यावरूनच रत्नागिरीसाठी पाठवली जात होती. रत्नागिरी पॅसेंजर दादर ऐवजी दिव्यावरून सोडली जात असल्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासीय प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
या संदर्भात रावसाहेब दानवे याची भेट घेऊन प्रवासी शिष्टमंडळ गाडी येत्या गणेशोत्सवापासून पुन्हा दादर येथूनच सोडली जावी या दृष्टीने रेल्वेला निर्देश देण्याची विनंती करणार आहे.