ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाच नंबर वन
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन
मुंबई, ५ ऑगस्ट : राज्यात २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शुक्रवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात ठिकठिकाणी काल मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्विवाद यश मिळविले असून भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिळविलेल्या विजयाचा विचार केला तर भाजपा – शिवसेना युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात सत्ताबदल होऊन भाजपा – शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे व त्यामध्ये जनतेने युतीला पसंती दिली आहे.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे आणि विकासाचा अजेंडा राबविणारे युतीचे सरकार हवे या भूमिकेतून बदल झाला. त्यानंतर जनतेने दिलेला आशिर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल.