https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

चोरवणे येथे रंगली चिखल-नांगरणी स्पर्धा!

0 66

गावठी गटात श्री भैरी चंडिका प्रसन्न चिपळूण व घाटी (खिलार) गटात रमेश पावसकर आसगे, लांजा प्रथम

नाणीज, दि २७ ः संगमेश्‍वर तालुक्यातील नाणीजनजीक असलेल्या चोरवणे येथे राज्यस्तरीय चिखल-नांगरणी स्पर्धा प्रचंड जोशात संपन्न झाल्या. त्यामध्ये गावठी गटात श्री भैरी चंडिका प्रसन्न चिपळूण व घाटी (खिलार) गटात रमेश पावसकर आसगे, लांजा यांनी प्रथम क्रमांक मिळवले. स्पर्धा पाहण्यास आजूबाजूच्या गावातील हजारो रसिकांनी गर्दी केली होती.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतींचे वारे वाहू लागले आहे. शेतकरी बांधव शेतीची कामे आटोपल्यानंतर वर्षा ऋतुमध्ये चिखल-नांगरणी स्पर्धा होतात. तशाच स्पर्धा आज (२७ ऑगस्ट) चोरवणे येथे झाल्या. ही स्पर्धा खिलार जोडी व गावठी जोडी अशा दोन गटांत झाल्या. स्पर्धेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ नाना कांबळे, उपाध्यक्ष अनिल गावडे, खजिनदार महेंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा झाल्या. दोन्ही गटांतील पहिल्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व आकर्षक चषक स्वरुपात गुलालाचा मान मिळाला. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा लक्षवेधी ठरली.
स्पर्धेचे मानकरी असे – गावठी गट- १) श्री भैरी चंडिका प्रसन्न, चिपळूण २) भैरी चंडिका प्रसन्न सावर्डेकर गुरूजी शिरवली ३) हुमने गुरुजी आगवे चिपळूण ४) शुभम सुर्वे संगमेश्‍वर ५) बागवाडी, देवरुख.
घाटी (खिलार) गट- १) रमेश पावसकर आसगे, लांजा २) ऋतिका संतोष बोडेकर, चाफवली ३) दिनेश दीपक लाड, भडकंबा ४) सुधीर गणपत सावर्डेकर, असुर्डे चिपळूण ५) बाबू तेली,गवाणे.
स्पर्धेला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच अनेक नामवंत उपस्थित होते. माजी सभापती जयाशेट माने, सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच अनंत बसवणकर, नाणीजचे सरपंच गौरव संसारे, नाणीजचे माजी सरपंच दत्ताराम शिवगण, चोरवणे गावप्रमुख मंदार कात्रे, जयवंत कात्रे, गावकर सखाराम कांबळे, शांताराम कांबळे, शिमगोत्सव कमिटी अध्यक्ष सदा कांबळे, माजी सरपंच विजय कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदेश चव्हाण, किरण पेडणेकर, दिपराज कांबळे, मुख्याध्यापिका दरडी मॅडम, ग्रामसेवक अनिल गोपाळ तसेच पंचक्रोशीतील सर्व मान्यवर उपस्थित होते. पहिल्या क्रमांकाच्या जोडीने १५.५६ सेंकदात ३०० मीटरचे मैदार पार केले. खिलार गटातील रमेश पावसकर यांच्या चन्या व सुलतान जोडी आज भाव खाऊन गेली. त्यातही चन्या बैल या भागात लोकप्रिय आहे. सर्वांच्या तोंडी त्याचेच नाव होते. त्याने अशा अनेक स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. स्पर्धा पाहण्यास पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने शौकिन उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.