जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबविण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
लम्पि चर्मरोग आढावा बैठक
अकोला : लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनावरांचे लसीकरण करणे ही महत्त्वाची उपाययोजना असून हे लसीकरण युद्धपातळीवर राबवावे, असे निर्देश राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घ्यावी, असे निर्देश ना. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
लम्पि चर्मरोग या जनावरांमधील संसर्गजन्य आजारासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज अकोला जिल्ह्यात आले होते. त्यांनी सकाळी निपाणा व पैलपाडा या गावांमध्ये भेट देऊन बाधित पशूंची पाहणी केली. पशुपालकांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.