महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला २० जुलैला
सुप्रीम कोर्टात घटना पीठासमोर होणार सुनावणी
नवी दिल्ली : एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे.
शिवसेनेच्या वतीने अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवारी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने खंडपीठाची स्थापना केली आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखील या खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.
या पिठामध्ये रमण्णा यांच्यासोबत कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली या न्यायाधिशांचाही समावेश आहे. 20 जुलैला या खंडपीठासमोर पहिली सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून अपात्रतेसंदर्भात जवळपास 7 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.