Ultimate magazine theme for WordPress.

शोभिवंत मत्स्य शेतीतून कोकणचा विकास शक्य : डॉ संजय भावे

0 39

दापोली : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या “सुवर्ण-महोत्सवी” वर्षानिमित्त आर्योजित “सुवर्ण-पालवी” कृषी महोत्सव दापोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. महोत्सवात शोभिवंत मत्स्य शेती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाचे उद्घाटक म्हणून बोलताना विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ संजय भावे यांनी मार्गदर्शन केले.


कोकणाला विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे, समुद्रांचे पाणी, गोडे पाणी आणि निमखारे पाणी केवळ कोकणला संपत्ती म्हणून लाभलेले असून, या पाण्याचा उपयोग शोभिवंत मत्स्य शेती करिता केल्यास, उत्पन्न आणि रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होवू शकेल. शोभिवंत मत्स्य शेतीचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले असून, या तंत्रज्ञानाचा वापर करून सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि युवकांनी संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. भावे यांनी परिसंवादाचे उद्घाटक म्हणून केले.
परिसंवादाचे अध्यक्ष डॉ शेखर कोवळे, माजी सहयोगी अधिष्ठाता, तर उपाध्यक्ष म्हणून डॉ प्रकाश शिनगारे, आजी सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय यांनी काम पाहिले. परीसंवादात मत्स्य विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ केतन चौधरी यांनी “शोभिवंत मत्स्य शेती: सद्यस्थिती आणि भवितव्य” या विषयावर मार्गदर्शन करताना जगात शोभिवंत मत्स्य शेतीचा व्यापार, आयात-निर्यात, भारताचा त्यातील सहभाग आणि कोकणातील शोभिवंत मत्स्य शेतीतील समस्या आणि उपाय याविषयी मार्गदर्शन केले. मुळदे, ता वेंगुर्ला येथील शोभिवंत मत्स्य संवर्धन संशोधन केदांचे प्रमुख डॉ नितीन सावंत यांनी शोभिवंत मत्स्य शेती व्यवसायातील स्वयं-रोजगार आणि उद्योगाच्या संधी या विषयी मार्गदर्शन करताना या व्यवसायाची व्याप्ती विषद केली. शोभिवंत मासे प्रजनन करणे, पिल्ले वाढविणे, पिल्लाची विक्री करणे, एक़्वरियम तयार करून विकणे, खेळणी विक्री, शोभिवंत पाण-वनस्पती संवर्धन आणि विक्री असे विविध व्यवसाय कसे करावेत आणि त्यातून रोजगार आणि उत्पन्नाची संधी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.
हर्णे-दापोली येथील प्रगतीशील शोभिवंत मत्स्य शेतकरी फहाद जमादार यांनी उपस्थित शेतक-यांना पूर्ण काचेच्या एक़्वारियम ची बांधणी आणि मांडणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित शेतक-यानी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष टाकी कशी तयार करावी, मांडणी कशी करावी, याचे कौशल्य आत्मसात केले. त्यांना ज्योती कारेकर यांनी मदत केली. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ संदेश पाटील यांनी शोभिवंत मत्स्य शेती करिता प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ कसा घ्यावा, विविध योजना, त्याकरिता आवश्यक कागदपत्रे कशी तयार करावी याचे मार्गदर्शन केले.

परिसंवादाला ६५ शेतक-यांनी उपस्थिती दिली आणि माहिती घेतली. त्यानंतर कोकणातील शोभिवंत मत्स्य शेतीतील समस्या आणि त्यावरील उपाय यावर शंका समाधान, प्रश्न -उत्तरे कार्यक्रम रंगला. उपस्थित शेतक-यांनी सुमारे ४५ मिनिटे विविध प्रश्न आणि शंका विचारून आपले शंका निरसन करून घेतले.
परिसंवादाचे वृत्त-संकलक म्हणून डॉ सुहास वासावे आणि डॉ भरत यादव, सहयोगी प्राध्यापक, विस्तार शिक्षण विभाग यांनी काम पहिले तर सूत्र संचालन भालचंद्र नाईक, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्य विस्तार शिक्षण विभाग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैभव येवले आणि श्री माधव गित्ते मत्स्य विस्तार शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांनी काम केले.

585616148
Leave A Reply

Your email address will not be published.