संगमेश्वर : कलातपस्वी अबालाल रहमान कला महर्षी बाबुराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी रंगबहार संस्थेच्या वतीने मैफिल रंग सुरांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार शिल्पकार तसेच कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी आमंत्रित केले जाते. कोल्हापूरमधील टाउन हॉल बागेत ही रंग मैफिल सजली. यामध्ये अनेक चित्रकार शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली. सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथील चित्रकार आणि शिल्पकारानी या उपक्रमात आपली दर्जेदार कला सादर करुन रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
कोकणातील अग्रगण्य चित्र शिल्पकला कला महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट,सावर्डेचे प्राचार्य माणिक यादव ( निसर्ग चित्र )व कलाविद्यार्थी श्रीनाथ मांडवकर( व्यक्तिशील्प ), तुषार पांचाळ( व्यक्ती शिल्प),करण आदावडे ( निसर्ग चित्र) यांनी चित्र व शिल्प प्रात्यक्षिके देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाप्रसंगी कोकणचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा.प्रकाश अर्जुन राजेशिर्के, रंगबहारचे अध्यक्ष धनंजय जाधव, शैलेश राऊत, राहुल रेपे,सुरेश मिरजकर, प्राचार्य अजय दळवी, विजय टिपुगडे, संजीव सकपाळ,विद्या बकरे, व्ही बी पाटील, इंद्रजीत नागेशकर,श्रीकांत डिग्रजकर,सुधीर पेटकर,गजेंद्र वाघमारे,अभिजीत कांबळे, नागेश हंकारे,मनोज दरेकर,निखिल अग्रवाल यांसह चित्रकार -शिल्पकार कला विद्यार्थी उपस्थित होते.