https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

बेकायदा मद्यविरोधी कारवाईत १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

0 153
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
  • अवैध मद्याविरोधत ६६ गुन्हे; ५१ जणांना अटक

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुध्द एकूण ६६ गुन्हे नोंद केले असून, ५१ आरोपीत इसमांना अटक केली आहे. या दाखल गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १ हजार ४०० लिटर, देशी मद्य ४५.९ बल्क लिटर, विदेशी मद्य ५६.७ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ९ हजार २७४.६३ बल्क लिटर, रसायन २७ हजार २०५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या वाहनांसह एकूण १ कोटी १९ लाख १४ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून चार पथके नेमण्यात आली आहेत.परराज्यातील/बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
जानेवारी २०२४ पासून अद्यापपर्यत महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ नुसार एकूण २८ प्रकरणात १६ लाख रुपये एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारु धंद्यात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर- रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरुन प्रवाशी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.

गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलीसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील.
जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतुक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास उत्पादन शुल्क विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक- ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.