https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीचा ४ ऑगस्टला ४३ वा स्थापना दिवस

0 78
  • व्याख्यानमालेचे आयोजन
  • कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची उपस्थिती

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले शिरगाव, रत्नागिरी येथील शासकीय मत्स्य महाविद्यालय उद्या दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ४३ वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे भूषविणार आहेत.

डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.

या निमित्ताने महाविद्यालयात स्थापन दिन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील मत्स्यशास्त्र विषयातील शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई या संस्थेचे सह-संचालक डॉ. एन. पी. साहू आणि गोवा राज्यातील राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या समुद्र विज्ञान संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी चे प्रधान शास्त्रज्ञ प्रा. श्रीपादा ए. आर. यांचा समावेश आहे.
मत्स्य शास्त्र या विषयात पदवी (बी. एफ. एस. सी.), पदव्युत्तर ( एम.एफ. एस. सी.) आणि आचार्य (पी. एच. डी.) अभ्यासक्रम राबविणारे मत्स्य महाविद्यालय शिरगांव रत्नागिरी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालय आहे.

डॉ. श्रीपादा ए. आर.
डॉ. एन. पी. साहू


महाविद्यालयाने अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या असून त्यात प्रशस्त तीन मजली इमारत, अद्ययावत वर्ग कक्ष, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, प्रक्षेत्र भेटी करीता ४५ आसनी बस, यांत्रिक संशोधन नौका, मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती प्रक्रिया कक्ष, मुलं आणि मुलींकरीता स्वतंत्र वसतिगृहे, क्रीडा सुविधा यांचा समावेश आहे.
गेल्या ४२ वर्षात या महाविद्यालयात देशाच्या जम्मू-काश्मिर ते तामिळनाडू व गुजरात ते मणिपूर आदी विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि पी. एच. डी. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे.


आज मत्स्य महाविद्यालय आपला स्थापना दिवस साजरा करीत आहे आणि यानिमित्ताने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली चे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय भावे हे प्रथमच महाविद्यालयाला भेट देणार आहेत. त्यांचा महाविद्यालयातर्फे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहवे.

– डॉ. प्रकाश शिनगारे,सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी.

या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदस्थ अधिकारी आणि यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. मत्स्य शास्त्रातील पदवीधारकांना मत्स्य विभाग, बॅंकिंग, व्यवस्थापन, मार्केटिंग, मत्स्य प्रक्रिया विभाग, शिक्षण, संशोधन, व्यवसाय आदी क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाला मत्स्यव्यवसाय विषयक धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता मत्स्य महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक आणि अनेक माजी विद्यार्थी वेळोवेळी सहकार्य करीत आहेत.
“आज मत्स्य महाविद्यालय आपला ४३ वा स्थापना दिवस साजरा करीत असताना महाविद्यालय शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण, सामाजिक व धोरणात्मक बाबीत आपलं राष्ट्रीय व राज्य स्तरावर विशेष योगदान देत आहे. या महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेले ९०% प्राध्यापक हे पी.एच. डी. धारक असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकर्षाने भर दिला जात आहे आणि म्हणूनच महाविद्यालयातील विद्यार्थी देश पातळीवर चमकदार कामगिरी करत आहेत,” असे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.