- लोकसभा निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
- जिल्ह्यात 5, 6, 7 मे व 4 जून रोजी मद्य विक्री बंद
- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह त्यांचे आदेश
रत्नागिरी, दि.15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून म्हणजेव 5 मे सायंकाळी 5 वाजलेपासून, मतदानाचा आदला दिवस 6 मे रोजी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस 7 मे रोजी मतदान प्रक्रीया समाप्त होईपर्यंत आणि 4 जून मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान व 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कालावधीत मद्य विक्री करण्यास मनाई/कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत सूचना केली आहे. त्यानुसार मतदानाच्या प्रत्येक टप्यातील मतदानाच्या दिनांकास समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या राज्य कायद्याच्या/नियमाच्या विहित तरतुदीनुसार मद्य विक्री मनाई/कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत आदेशीत केले आहे.
मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 च्या कलम 142 (1) नुसार प्रदान केलेल्या आधिकाराचा वापर करुन, लोप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य व माडी विक्री 5 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून, मतदानाचा आदला दिवस 6 मे रोजी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस 7 मे रोजी मतदान प्रक्रीया समाप्त होईपर्यंत आणि 4 जून मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश श्री. सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, त्यात कसूर झाल्यास अनुप्तीधारकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 54 व 56 मधील तरतुदींनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपती रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.