२३ ऑगस्ट : राष्ट्रीय अंतराळ दिन | चंद्राला स्पर्श : देशाभिमान जागृती..!!
इस्रो…अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था.. या संस्थेच्या गगनभरारीचे कौतुकास्पद यश जगाचे डोळे दीपविणारे आहे. गतवर्षी १४ जुलै रोजी दुपारी २:३५ वा. दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहताना आमच्या जिल्हा परिषद शाळा शिरवलीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या टाळ्यांचा कडकडाट… आणि जल्लोष आठवतोय.. निमित्त होतं ते चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाचे. सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेशवरुन हे जवळपास ३ हजार ९०० कि. ग्रॅमचे प्रक्षेपण यशस्वीरित्या झाले. विज्ञान तंत्रज्ञानाचे हे यश विद्यार्थी जीवनात आनंदानुभूती देणारं होतं. देशभर चर्चा होती ती चांद्रयान ३ ची..!! पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर अंदाजे ३ लाख८४ हजार किलोमीटर आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या अचूक प्रक्रियेमुळे चांद्रयान-३ चे ‘विक्रम लँडर’ २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले…. आणि पुन्हा देशभरच नव्हे तर जगभर जल्लोष केला गेला.
चांद्रमोहिमेच्या या यशस्वीतेच्या चार चाॅंदाचे मानकरी भारतीय वैज्ञानिक आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे यशाचे टिपूर चांदणे पडले. रोषणाई झाली. संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा केला गेला. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जगही अवाक् झाले. प्रत्येक भारतीयांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश आहे. भारताच्या या कामगिरीचे संपूर्ण जगातून कौतुक झाले.
याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले आणि आज भारत सरकारच्या वतीने २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून भारतभर साजरा केला जात आहे. आपला देश पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस “चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे : भारताची अंतराळ गाथा ” या थीमसह साजरा करीत आहे. हा विशेष दिवस भारताच्या उल्लेखनीय अंतराळ मोहिमांचा गौरव करणारा आहे. देशाच्या तरुणांना प्रेरणा देवून शोधाची भावना विकसित करेल, अशी आशा आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अंतराळ संशोधन मोहिमांचे कौतुक आणि अभिमान ओसंडून वाहत आहे. तो वृद्धिंगत व्हावा, हा उद्देश आहेच. पण देशाभिमानाची, संशोधनाची ज्योतही तेवत राहील. भारताची युवा पिढी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी भारलेली आहे. त्यामागे आपल्या अंतराळ मोहिमेचे यश आहे. मंगलयान आणि चंद्रयान या मोहिमांचे यश तसेच आगामी गगनयानामुळे देशाच्या युवा पिढीला नवा उत्साह मिळाला आहे.
भारतातील प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकाच्या रूपात स्वत:चे भविष्य पहात आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी केवळ चंद्रावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नसून एक देदीप्यमान सुयश प्राप्त केले आहे. यामुळे भारताची संपूर्ण पिढी जागृत झाली असून त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. भारतीय मुलांमध्ये आकांक्षेचे बीज रोवले आहे, ते भविष्यात वटवृक्ष बनणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यासाठी हा राष्ट्रीय अंतराळ दिन प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वाटतो. चांद्रयानचे मून लँडर ज्या जागेवर उतरले तो भाग ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जात आहे. ‘शिव’ मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि ‘शक्ती’ आपल्याला हा संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचे हे ‘शिवशक्ती’ स्थान देखील आपल्याला हिमालयासोबत कन्याकुमारीशी असलेल्या संबंधांची अनुभूती देणार आहे. या पवित्र संकल्पाला शक्तीचे आशीर्वाद हवेत आणि ही शक्ती म्हणजे आपली नारीशक्ती आहे. चांद्रयान-३ च्या या चांद्रमोहिमेच्या यशात आपल्या देशाच्या महिला शास्त्रज्ञांनी, देशाच्या नारी शक्तीने मोठी भूमिका बजावली आहे.
चंद्रावरील ‘शिवशक्ती’ हे स्थान भारताच्या वैज्ञानिक आणि तत्वज्ञानाधारित विचारसरणीचा दाखला देणारे प्रतीक बनेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सौरऊर्जेद्वारे त्यांची पुढील प्रक्रिया करणार होते.चंद्रावर १४ दिवस रात्र आणि १४ दिवस प्रकाश असतो. विक्रम लँडर आणि प्रज्ञान दिवसाऐवजी रात्री उतरलं असतं तर काम करणं कठीण झालं असतं. अचूक गणनेनंतरच इस्रोचे शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले की, या तारखेला दक्षिण ध्रुवावर पुरेसा सूर्यप्रकाश असेल. २२ ऑगस्टपासून चंद्रावर दिवस होता. त्याचा फायदा विक्रम लँडर आणि प्रज्ञानला व्हावा. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञानला सूर्यापासून ऊर्जा मिळत रहावी.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उणे २३० अंश तापमान… कडाक्याची थंडी. अशा स्थितीत काम करणं विक्रम आणि प्रज्ञानला अवघड जाईल, म्हणून २३ ऑगस्टची तारीख विचारपूर्वक निवडण्यात आली आणि तो सुवर्णदिन अवतरला. चंद्रावर पोहोचणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर आतापर्यंत कोणत्याही देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवता आले नाही. ते भारताने करुन दाखविले.देशाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल जगभर गौरवोद्गार काढले जात आहे. सुमारे सहा हजार कि.मी. प्रति तास इतक्या महाप्रचंड वेगात आपली परिक्रमा पूर्ण करणाऱ्या यानाचा वेग फक्त १० किमी प्रति तास इतका कमी करणे आणि आडवे धावणाऱ्यास अचानक उभे करून पृष्ठभागावर उतरवणे हे कल्पनाही करता येणार नाही इतके प्रचंड आव्हान इस्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वीपणे पेलले. कोणत्याही विज्ञानप्रेमींसाठी हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, इतका मोठा ठरतो. म्हणूनच २३ ऑगस्ट हा भारतीय अवकाश क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस असून ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारा आहे. युवा पिढीला.. विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारा आहे.