रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिरा नजीकच्या समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बुडालेल्यामध्ये एका नामांकित कंपनीतील दोघा जणांचा समावेश आहे.
येथील समुद्रात स्नानासाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्घटनेत मोहम्मद आसिफ (वय ३५ राहणार पश्चिम बंगाल, सध्या रा. जयगड व प्रदीपकुमार, वय ३५, राहणार ओडिशा, सध्या जयगड) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर ठुकु डाकवा (३०, उत्तराखंड, सध्या रा. जयगड) याला वाचविण्यात गणपतीपुळे येथील देवस्थानचे जीवरक्षक तसेच स्थानिकांना यश आले.
गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक स्थानिकांकडून केल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती घडत आहे. रविवारच्या दुर्घटने दरम्यानही किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्घटनाग्रस्तांकडून दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.