पनवेलकरांच्या मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
- खासदार श्रीरंग बारणे यांनी केली होती मागणी
- पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी केला होता पाठपुरावा
उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या पाठपुराव्याची, पत्रव्यवहाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून लवकरच पनवेलकरांच्या मालमत्ता कराची शास्ती माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीरंग बारणे,जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांना दिले आहे. त्यामुळे लवकरच पनवेलकरांचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.
पनवेल विभागातील नैना प्रकल्प, गावठाण विस्तार, पनवेल महापालिकेचे मिळकत करा संदर्भात विविध समस्या नागरिकांना भेडसावत होत्या.त्यामुळे या समस्या सोडवण्याची व विविध उपाय योजना करण्याची मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहाराद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून सुद्धा केली होती. या समस्या संदर्भात जनतेच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत शिवसेना शिंदे गटाचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास वामनराव शेवाळे यांनी देखील पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मालमत्ता करासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याचे मागणी केली होती.
मालमत्ता करा संदर्भात रामदास शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन सात वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही मालमत्ता कराचा तिढा सुटलेला नाही. सिडको कडून सेवा हस्तांतरित करून घ्यायला महापालिकेला विलंब लागला. त्याचबरोबर मालमत्ता कर निश्चित करण्यासाठी ही वेळ गेला. दरम्यानच्या काळात सिडको वसाहतीतील रहिवाशांनी सेवा कर प्राधिकरणाला अदा केला. असे असताना मनपाने दुहेरी व पूर्वलक्षी मालमत्ता कर रहिवाशांवर लादला.आजूबाजूच्या महापालिकांच्या तुलनेत पनवेलच्या मालमत्ता कराचा दर हा जास्त आहे. तो कमी असल्याचे प्रशासन भासत असले तरी तांत्रिकदृष्ट्या निश्चित करण्यात आलेला कर हा अवास्तव आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारकडून पुनरावलोकन होणे आवश्यक आहे. जेणेकरून अवास्तव आणि जास्त कराचा बोजा रहिवाशांवर लादला जाऊ नये. त्याचबरोबर पूर्वलक्षी आणि दुहेरी मालमत्ता कर याव्यतिरिक्त त्यावर लावण्यात येणाऱ्या शास्ती पूर्णपणे माफ करण्यात यावी अशी विनंती समस्त पनवेलकरांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगर विकास विभाग आणि महापालिका प्रशासनाला आदेश देऊन पनवेलकरांना न्याय द्यावा अशी मागणी मी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून गेल्या वर्षीच मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही होईल असा आशावाद व्यक्त करतो. या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने त्याचा फायदा पनवेलकरांना मोठया प्रमाणात होणार आहे. असे मत रामदास शेवाळे यांनी व्यक्त केले.