इंडियन ऑईलविरोधात धूतूम ग्रा. पं.सह ग्रामस्थांचे आमरण उपोषण
भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची उपोषणाद्वारे आग्रहाची मागणी
उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकिंग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत गेल्या २५ वर्षात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून न घेता सतत परप्रांतियांना नोकरीत स्थान दिल्याने स्थानिक भूमिपुत्र अजूनही बेरोजगार राहिला आहे.पर्यायाने सदर कंपनी प्रशासनाने स्थानिक तरुणांना तत्काळ रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी कंपनी विरोधात २० नोव्हेंबर पासून धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण सुरु झाले आहे.
दि २० नोव्हेंबर २०२३ रोजी आंदोलनाचा पहिला दिवस होता. १९९७ साली धुतूम ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंडीयन ऑईल टँकिंग ही कंपनी सुरू झाली.या कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित झाल्या.या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीच्या नोकर भरतीत सामावून घेण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र गेल्या २५ वर्षांत गावातील फक्त तिघांना कंपनीच्या मुख्य कर्मचाऱ्यांत सामावून घेण्यात आले असून बहुतेक कामगार भरती परराज्यातून करण्यात आली.विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब गेल्या २५ वर्षात कोणीच विचारला नाही. मात्र सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी सरपंच पदाचा कारभार सुरू करताच आय ओ.टी.एल कंपनीच्या बेलगाम कारभारा विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.जोपर्यंत बेरोजगारांना प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळत नाही.तोपर्यंत हा लढा असाच सुरु ठेवणार असल्याचे धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले. आयओटीएल कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांनी आपल्या बहुमूल्य जमिनी दिल्याने या कंपनीत त्यांना नोकऱ्या आजपावेतो दिल्या गेल्या नाहीत. याचा जाब सरपंच सुचिता ठाकूर यांनी उपोषण स्थळी कंपनी प्रशासनाला विचारला आहे.मात्र कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत गंभीर नसल्याचे दिसून आले.
जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार धूतूम ग्रामस्थांनी केला असून सदर आमरण उपोषण वेळी धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य – प्रेमनाथ ठाकूर,स्मिता ठाकूर, सुचिता कडू, अनिता ठाकूर, करिष्मा ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात अनेक मुले मुली उच्च शिक्षित असूनही त्यांना नोकर भरतीत सामावून न घेता कंपनी प्रशासन स्थानिक भूमी पुत्रांवर अन्याय करीत असल्याची भावना व्यक्त करून इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स कंपनीने आपली हुकूमशाही वृत्ती बदलली नसल्याने कंपनीच्या प्रवेशद्वारात २० नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती धुतूम ग्रामपंचायतचे सदस्य प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली आहे.
सदर आमरण उपोषणाला माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर,माजी पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शिवसेना द्रोणागिरी शाखा प्रमुख जगजीवन भोईर,काँग्रेसचे ओबीसी कोकण विभाग अध्यक्ष शंभु म्हात्रे, ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश भोईर, एनएमकेजीएस या कामगार संघटनेचे सचिव वैभव पाटील, काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील आदींनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊ आपला जाहीर पाठिंबा दिला.