मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जन आक्रोश समितीची माणगावमध्ये दिंडी यात्रा
दिंडी यात्रेला माणगावमधील विविध ५० संघटनांचा पाठिंबा
भर पावसातही मुंबई गोवा महामार्गासाठी कोकणवासीय सरसावले
माणगाव ( रायगड) : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या जन आक्रोश समितीने माणगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर दिंडी यात्रा काढली. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री. सानप यांच्या दालनात महामार्गाचे काम करणारे ठेकेदार तसेच जन आक्रोश समितीचे प्रतिनिधी यांच्यादरम्यान बैठक झाली. यावेळी समितीने निदर्शनास आणून दिलेल्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वस्त करण्यात आले.
मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती-माणगाव तालुका आयोजित ही “दिंडीयात्रा” अगदी कोकणवासियांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरली. सकाळी १०:३० वाजता आंब्रेला हॉटेल शेजारी सर्व कोकणकरांनी टाळ मृदूंगाच्या सुमधुर आवाजात भजनावर ठेका धरला. यानंतर सदर दिंडी माणगाव आगार येथे पोहचली.
माणगाव आगार ते प्रांत अधिकारी कार्यालय अशा एक किलोमीटरच्या दिंडीयात्रेला ११:४५ वाजता सुरुवात करण्यात आली तर ही दिंडी प्रांतधिकारी यांच्या कार्यालयात दुपारी १:०० वाजता पोहचली.
यानंतर समितीचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी श्री. सानप यांच्या दालनात निवेदन देण्यासाठी गेले असता तेथे ठिकाणी ठेकेदार,जनआक्रोश समिती शिष्टमंडळ, विविध उपस्थित संघटनेचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात बैठक झाली.
यावेळी झालेल्या चर्चेत अण्णा साबळे, दळवी या स्थानिकांनी अनेक मुद्दे अधिकारी वर्गासमोर मांडले. यावर सखोल चर्चा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थित कोकणवासियांना आपण मांडलेले सर्व मुद्दे लवकरात लवकर सोडविण्यासाठी एकत्रित पाहणी करून ८ दिवसात पुन्हा याच दालनात समितीच्या प्रतिनिधीबरोबर मिटिंग घेण्यात येईल व तत्काळ उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
जन आक्रोश समितीने पोलिसांच्या विनंतीला मान देऊन जन आक्रोश समितीने सन अक्षर मार्गाने दिंडीयात्रा काढली परंतु आम्हा कोकणवासियांची दखल ना घेता महामार्गाचे आणि बायपासचे काम मार्गी लावले नाही तर जर
हेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
माणगावमध्ये सध्या भरपूर पाऊस पडत असूनही या पूर्ण दिंडी यात्रेला स्थानिक व मुंबईहून आलेल्या अशा जवळजवळ ३०० कोकणकर उपस्थित राहिले होते. या दिंडीयात्रेला वारकरी संप्रदायानी सक्रिय सहभाग घेऊन दिंडीयात्रेला शोभा आणली.
या दिंडी यात्रेला माणगावमधील विविध ५० संघटनांनी पाठिंबा दर्शवून सहभाग नोंदवला.
मुंबई गोवा महामार्गासाठी झगडणाऱ्या जन आक्रोश समितीच्या माणगाव तालुका टीमने जबाबदारी स्विकारून दिंडी यात्रा यशस्वी केली. हे आंदोलन फक्त माणगावपर्यंत नसून पूर्ण कोकणसाठी आहे आणि आगामी काळात हे आंदोलन कोकण जोडो या अभियांनांतर्गत कोकणात सर्वत्र केले जाईल, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
(हे सुद्धा वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!)