https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0 109

रत्नागिरी, दि.१६:  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे व मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 135 (ब) नुसार भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांचे अधिपत्याखालील सर्व अधिकारी / कर्मचारी / कामगार यांना खालील अटी व शर्तींचे अधीन राहून बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानासाठी भरपगारी सुट्टी अथवा काही तासाची सवलत मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.

२६६-रत्नागिरी मतदार संघात ९८ वर्षीय इंदिरा विष्णू सावंत यांनी मदतनीसाच्या सहायाने गृह मतदान केले


निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामान्यतः वेतन मिळणार नाही या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्या दिवशी त्याला सुट्टी दिली नसती तर त्याने काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शापिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना लागू राहील.
जर एखाद्या नियोक्त्याने उप-कलम (1) किंवा उप-कलम (ii) च्या तरतुदींचे उल्लंघन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल.
पोटकलम (iv) हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही ज्याच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
उपरोक्त उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सूचित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.