रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मिनी सरस व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 28 डिसेंबर रोजी उद्योगमंत्री उदय सामंत व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामाध्ये जिल्ह्यातील एकूण 75 बचत गट सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील स्वरोजगारींनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. यामध्ये बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तु (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तु, क्रेयॉनच्या वस्तु, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी) विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले) पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसुण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोहयाचे, ओव्याचे इत्यादी) लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी) कोकम, आगळ इत्यादी., कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद चडी, तळलेले गरे इत्यादी) विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी) रस, कोकणी खादयपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी, जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे. बोन्साय इत्यादी) मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. नाताळच्या सुट्टीमध्ये प्रदर्शन असल्याने मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल.
प्रदर्शन काळात संध्याकाळी स्वयंसहाय्यता समुहातील सदस्य यांचे मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामुहिक कार्यक्रम, सहभागी स्टॉल प्रतिनिधींकरीता फनी गेम आयोजित करण्यात येणार आहेत.
सहभागी स्वयंसहायता समुहातील उत्कृष्ट काम केलेले बँक शाखाधिकारी यांचा गौरव, उत्कृष्ट कामकाज केलेल्या महिलांचा गौरव, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त प्रभागसंघाचा गौरव, नवीन उत्पादनाचे अनावरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा सांगता समारंभ 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणा-या स्वयंसहाय्यता समुहाचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.