यंदाच्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी घाटाऐवजी कशेडी बोगद्यातून येतील : ना. रवींद्र चव्हाण
गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेनचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य देणार : सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण
रत्नागिरी दि : १४ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे टाळण्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील एक सिंगल लेन सुरु करण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
आज सकाळपासून पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी मंत्री चव्हाण यांनी सुरु केली . या महामार्गाची पहाणी करत असताना कशेडी घाटातील दोनपैकी एक बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेश भक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या .दोन पैकी एका सिंगल लेनचे काम पूर्ण झाल्यास यंदा गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी घाटाऐवजी बोगद्यातून येतील अशी आशा निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवापर्यंत बोगद्यातील एक मार्गिका पूर्ण झाल्यास प्रवाशांचा सुमारे 45 मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचे सांगून सध्या पावसाळयात महामार्गाचे काम हेअत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे यामध्ये हलगर्जीपणा नको तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मंत्री चव्हाण यांनी भर पावसात कशेडी बोगदा, परशुराम घाटासह मुंबई गोवा महामार्गावरील इतर ठिकाणच्या कामाची पहाणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्व. बांधकाम विभागाचे तसेच महामार्गाशी संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.